
राज्यात शिक्षकांची 30 हजार 209 पदे भरण्यासाठी मेगा भरती सुरू आहे. मात्र त्यात क्रीडा शिक्षकांवर अन्याय झाला आहे. क्रीडा शिक्षकांची 4860 मंजूर पदे या भरतीमधून वगळली गेल्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शाळांमध्ये शिक्षकांबरोबरच क्रीडा शिक्षक हासुद्धा एक महत्त्वाचा घटक असतो. पवित्र पोर्टलवर शिक्षकांची भरती सुरू आहे, पण त्यावर क्रीडा शिक्षकांची मंजूर पदे मात्र उपलब्धच करून देण्यात आलेली नाहीत. सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना 11 ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, क्रीडा शिक्षकांसाठी एकही प्रवर्ग भरतीच्या यादीत नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बीपीएड पात्र शिक्षकांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 2 जानेवारी 2026 रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार राज्यातील 4860 समूह साधन केंद्रांवर प्रत्येकी एक केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (क्रीडा) पद मंजूर करण्यात आले आहे. आठ ते दहा शाळांचे एक समूह केंद्र असते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी आणि शासकीय शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची अनेक पदेही रिक्त आहेत. राज्य सरकारने क्रीडा शिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेय का, असा सवाल उमेदवारांकडून केला जात आहे.
क्रीडा शिक्षकांची विभागनिहाय मंजूर पदे
पुणे 1,035, छत्रपती संभाजीनगर 909, कोकण 876, नाशिक 833, अमरावती 605 आणि नागपूर 602

































































