अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षांची शिक्षा; भक्कम पुरावे आणि पोलिसांच्या सखोल तपासाचे यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या एका आरोपीला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. पोलिसांनी सर्व बाजूंनी केलेला तपास आणि न्यायालयात सादर केलेल्या भक्कम पुराव्यांचे हे यश मानले जात आहे.

आकाश संजय पानपाटील (27) असे आरोपीचे नाव आहे. बूट ठेवण्याच्या बहाण्याने घरात बोलावून पानपाटील याने 11 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला.

पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून आरोपीविरोधात भक्कम वस्तुनिष्ठ पुरावे गोळा केले आणि अत्यंत कमी वेळेत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील उषा जाधव यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. त्या आधारे न्यायालयाने आरोपीला 20 वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस आयुक्त योगेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर, पोलीस निरीक्षक अतुल निकम, साजिद काझी, नसरीन शेख, संजय चव्हाण, सागर भोगले, नीलेश पाटील यांनी या प्रकरणात उत्तम कामगिरी पार पाडली.