मुंबईतील गोदामात अस्वच्छता आणि झुरळांचा मुक्त संचार; ‘ब्लिंकीट’चा अन्न परवाना निलंबित, एफडीएची धडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहा मिनिटांत डिलिव्हरी करणाऱ्या ब्लिंकीटला आज अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जोरदार झटका दिला. ब्लिंकीटच्या गोदामावरच धाड घातली. तिथे मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता आणि झुरळांचा मुक्त वावर दिसून आला. त्यामुळे ब्लिंकीटचा अन्नपरवाना तातडीने निलंबित करण्यात आला आहे.

अन्नपदार्थांच्या साठवणूक व हाताळणीच्या ठिकाणी कीटक व उंदीर नियंत्रणाच्या प्रभावी उपाययोजनांचा अभाव, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, स्वच्छता व देखभालीचा अभाव, अन्न हाताळणाऱया कर्मचाऱयांच्या वैद्यकीय तपासणी व आरोग्यविषयक नोंदींचा अभाव, आवश्यक वैयक्तिक स्वच्छता व संरक्षणात्मक साधनांचा अभाव अशा बाबीही निदर्शनास आल्या. काही अन्नपदार्थ अयोग्य स्थितीत साठवलेले आढळून आले.

आस्थापनेतील भाजीपाला व फळांच्या साठय़ावर झुरळांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आल्याने अन्नपदार्थांच्या दूषित होण्याचा गंभीर धोका निर्माण झालेला असल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आले. तसेच कोल्ड रूममध्ये मुदतबाह्य व खराब झालेल्या पॅकेजेसचा साठा आढळून आला. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील तरतुदींनुसार ब्लिंकीटचा परवाना पुढील आदेशापर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.

परवाना निलंबित असताना सदर आस्थापनेतून कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांची विक्री, वितरण किंवा अन्न व्यवसाय सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा एफडीएने दिला आहे.