
मुंबईतील रस्ते 100 टक्के सिमेंट काँक्रिटीकरण करून खड्डेमुक्त मुंबईची तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा चार वर्षांनंतरही हवेतच राहिली आहे. मुंबईतील अनेक अंतर्गत रस्त्यांची सद्यस्थितीत अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे हे खड्डे भरण्यासाठी पालिका पुन्हा ‘कोल्ड मिक्स’ वापरणार असून यासाठी 2 कोटी 36 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या 6 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या 900 किमी लांब रस्त्यांची देखभाल व परिरक्षण पालिकेकडून केले जाते.
पावसाळ्यात या रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या आणखीनच वाढते. या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे कोल्ड मिक्स बनवण्याची लोअर परळे येथील जागा पालिकेने आता भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एप्रिलपासून या ठिकाणचे कोल्ड मिक्स उत्पादन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळा कालावधीत पडणारे खड्डे भरण्यासाठी कोल्ड मिक्सचा पुरवठा करण्यासाठी पंत्राटदार नेमण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी मे. मित्तल पेट्रो फार्मा केम या कंत्राटदाराला काम देण्यात येणार आहे.
अर्ध्या तासात वाहतूक सुरू
कंत्राटदाराकडून पुरवण्यात येणाऱया कोल्ड मिक्सचा पुरवठा 26 विभागीय कार्यालयांकडून केला जाणार असून त्याचा वापर विभागस्तरावर कामगारांकडून केला जाणार आहे.
कंत्राटदाराकडून 3 हजार टन कोल्ड मिक्सचा पुरवठा केला जाईल. यामध्ये 6 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले जाणार आहेत. पाऊस नसताना हे कोल्ड मिक्स वापरले जाईल.
खड्डा बुजवल्यानंतर संबंधित रस्ता अर्ध्या तासात वाहतुकीसाठी खुला होईल, असे पालिकेच्या रस्ते विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, यापूर्वी कोल्ड मिक्स अकार्यक्षम ठरत असल्याचे निदर्शनास आल्याने सर्वपक्षीयांनी त्याच्या वापरावर वारंवार आक्षेप घेतला असल्याने स्थायी समितीत या प्रस्तावावर खडाजंगी होण्याची शक्यता आहे.





























































