अमूलच्या नावाने भेसळयुक्त दूध विकले! पाच वर्षांपासून वसईत कारखाना, 18 लाख पिशव्यांची विक्री, चौघांना बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुधात भेसळ करून ते दूध विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका टोळीला मुंबई गुन्हे शाखेने दणका दिला. अमूल या नामांकित दुधाच्या रिकाम्या पिशव्या बनवून त्या वितरित करणारा आणि त्या पिशव्यांमधून भेसळीचे दूध विकणाऱ्या तेलंगणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

9 जुलै रोजी गुन्हे शाखा युनिट-12 च्या पथकाने दहिसर पूर्वेकडे अमूल गोल्ड, अमूल ताजा या नामांकित दुधात अशुद्ध पाण्याची भेसळ करून ते भेसळयुक्त दूध विकणाऱ्या एकाला पकडले होते. त्याचवेळी भेसळयुक्त दूध विकण्यासाठी बनावट पिशव्या विकणाऱ्या आणखी एकाला पकडले. मग त्या दोघांच्या चौकशीत पिशव्या विकणाऱ्या आणखी दोघांचे नाव समोर आले. त्या दोघांना पकडल्यावर मुंबईमध्ये अमूल दुधाच्या बनावट पिशव्या बनवून विकणाऱ्या रामुलू बोडुपल्ली या समाजपंटकाचे नाव समजले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संदीप येडे-पाटील, निरीक्षक बाळासाहेब राऊत, पूजा खांडेकर, विजय रासकर, स.पो.नि. समीर मुजावर, युवराज चव्हाण व पथकाने कसून शोध घेऊन बोडुपल्ली याला अंधेरी येथून उचलले. त्याच्या चौकशीत त्याने अमूलच्या नावे बनावट पिशव्या बनविण्याचा कारखानाच वसईतील वाळीव फाटा येथे थाटल्याचे सांगितले.

2021 पासून सर्रास काळाबाजार

रामुलू बोडुपल्ली हा मूळचा तेलंगणाचा आहे. अंधेरीत तो दुधात भेसळ करून ते विकायचे काम करायचा. त्याने वसईत अमूल पंपनीच्या हुबेहूब पिशव्या बनविण्याचा कारखाना थाटला होता. 2021 पासून आतापर्यंत त्याने 18 लाख अमूलच्या बनावट पिशव्या बनवून मुंबईत विकल्या. एक पिशवी अडीच रुपयाला असे महिन्याला 30 हजार पिशव्या तो विकायचा, असे उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सांगितले.

चहाची टपरी, सोसायट्या, हॉटेलमध्ये विक्री

दुधात भेसळ करून ते नागरिकांना विकणाऱ्या भिक्शमया घंटा, सैदूलू जंगिली, यादाय्या बतुल्ला आणि बोडूपल्ली अशा चौघांना बेड्या ठोकल्या. भेसळयुक्त दूध अमूलच्या नावाखाली हे आरोपी चहाची टपरी, सोसायट्या आणि हॉटेलमध्ये विकायचे.