
भडकती महागाई, महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आज उरण आणि शहापूरमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. किसान सभा, जनवादी महिला संघटना व सीआयटीयू (CITU) संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत ‘मोदी चले जाव’चे नारे देण्यात आले. शेतकरी-कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा सीआयटीयू व किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार असल्याचे सांगणाऱ्या केंद्र सरकारने बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. झेन-झीच्या आंदोलनानंतर शिक्षण क्षेत्रातील अराजकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. शेती उत्पादनाला हमीभाव न देता सरकारने सुलतानी संकट लादले आहे.
२९ कामगार कायदे रद्द करून भांडवलदारांना कामगारांचे शोषण करण्याची मुभा दिली आहे. महिलांवरील अन्याय, अत्याचारात वाढ झाली आहे. राज्यात योजनांचा दुष्काळ आहे. याविरोधात संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली देशभरात आंदोलन पुकारले आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आज उरण आणि शहापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला.
जेल भरो आंदोलन
शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सीआयटीयू आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शहापूर तहसील कार्यालयासमोर ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करून नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच वनजमिनी व इतर जमिनींच्या हक्कांचा प्रश्न मार्गी लावावा, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
































































