
भारतीय जनता पक्षाचा राज्यसभेचा खासदार हरभजन सिंग याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे वादाला तोंड फुटले आहे. हरभजन सिंग याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुण नशेच्या धुंदीत रस्त्यावर एकाच जागी स्थिर उभे असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पंजाबमधील असल्याचा दावा हरभजन सिंग याने केला. मात्र पंजाब पोलिसांनी केलेल्या फॅक्ट चेकमध्ये वेगळेच सत्य बाहेर आले. यावरून आता पंजाब सरकार आणि आम आदमी पार्टीने हरभजन सिंगसह भाजपवर चौफेर हल्ला चढवला आहे.
हरभजन सिंग याने एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत पंजाब सरकारवर टीका केली होती. पंजाबची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटत आहे. पंजाब आणि येथील तरुणाईला चांगल्या भविष्याची गरज आहे. या मुद्द्यावर नकारघंटा न वाजवता प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि तातडीच्या कारवाईची गरज आहे. जे पंजाब कधीकाळी आपल्या शौर्यासाठी, धैर्यासाठी आणि प्रगतीसाठी ओळखले जायचे, ते आज नशेच्या विळख्यात सापडले आहे. सत्ताधाऱ्यांनी माझ्या पंजाबला आणि पंजाबी तरुणाईला उद्ध्वस्त केले आहे, अशी टीका हरभजनने केली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंजाब पोलिसांनी फॅक्ट चेक करत आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून स्पष्टीकरण दिले.
हरभजनने शेअर केलेला हा व्हिडिओ पंजाबमधील नसून राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. व्हिडिओच्या मागे पंजाबी गाणे जोडल्याने ती घटना पंजाबची होत नाही. कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या कंटेंट पोस्ट करण्यापूर्वी किंवा पंजाब पोलिसांना टॅग करण्यापूर्वी सोशल मीडिया युजर्सनी तथ्य आणि स्थानाची खात्री करावी,” असे आवाहन पोलिसांनी केले. यात पोलिसांनी हरभजन सिंग यालाही टॅग करत जबाबदारीने माहिती शेअर करणे महत्त्वाचे असल्याचा टोलाही लगावला.
The video being circulated is from Sri Ganganagar, Rajasthan—not Punjab—and has no connection with Punjab Police.
A Punjabi audio track does not make an incident a Punjab incident.
We urge users and social media accounts to verify the facts and location before posting… https://t.co/bNHwjXVXsC
— Punjab Police India (@PunjabPoliceInd) August 10, 2026
दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप खोटारडेपणा करत असल्याचा आरोप केला. काल भाजपच्या अनेक लोकांनी एकत्र येऊन हा लबाडीचा प्रचार केला. हे सांगण्याचे आदेश थेट पीएमओ कडून आले होते का? देशाचे पंतप्रधान कार्यालय देशात खोट्या गोष्टी पसरवते का? असा सवाल केजरीवाल यांनी केला.
दुसरीकडे पंजाबच्या कॅबिनेट मंत्री डॉ. बलजित कौर यांनी हरभजन सिंग यांच्यावर टीका केली. राजकीय वरिष्ठांना खूश करण्यासाठी राजस्थानचा व्हिडिओ पंजाबचा असल्याचे सांगून ते राज्याची प्रतिमा मलिन करत आहेत. पंजाबची जनता हा प्रकार कधीही माफ करणार नाही, असा टोला डॉ. बलजित कौर यांनी केली.
Look at the desperation to please his political bosses. He is sharing a video from Rajasthan and lying that it is from Punjab. You will do anything for BJP ki dalali, even if it means ruining Punjab’s image. The people of Punjab will never forgive you for this.… https://t.co/d1JT5QFkzT
— Dr. Baljit Kaur (@DrBaljitAAP) August 10, 2026


























































