
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दादा म्हणून ओळखला जाणारा सौरव गांगुली आणि त्याची पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गांगुलीने पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली असून कोलकाता पोलिसांनी गांगुली दाम्पत्याच्या सुरक्षेत वाढ करत या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या सौरव गांगुलीच्या व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून अशी धमकीची पत्रे सातत्याने येत होती. सुरुवातीला या पत्रांकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नव्हते. मात्र, गुरुवारी गांगुलीच्या कार्यालयात मिळालेल्या दोन पत्रांमध्ये त्याला, त्याची पत्नी डोना गांगुली आणि जवळच्या सहकाऱ्यांना जीवे मारण्याची थेट धमकी देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गांगुलीने दक्षिण कोलकात्यातील ठाकूरपुकुर पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर कोलकाता पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आहेत. प्राथमिक तपासात ही सर्व पत्रे कूरियर सर्व्हिसद्वारे पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ही पत्रे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बेलघरिये येथून पाठवण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
कूरियर एजन्सीच्या कर्मचाऱ्यांशी बोलणी करून पार्सलचे तपशील गोळा केले जात आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित एका संशयित मोबाईल नंबरचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले असून पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर आहे, तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, धमकीची ही सर्व पत्रे एकाच व्यक्तीने पाठवली आहेत की यात काही वेगळा कट आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. आम्ही या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. पत्रातील मजकूर, त्याचा स्रोत आणि कूरियर नेटवर्कचा बारकाईने तपास सुरू आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. गांगुलीला धमकी देण्यामागे नेमका काय हेतू असावा, या दिशेनेही तपास यंत्रणा काम करत आहेत.






























































