बारडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; ५ शेळ्या ठार, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुदखेड तालुक्यातील बारड येथील लहुजी नगर परिसरात बिबट्याने काल रात्री धुमाकूळ घालत एका गरीब शेतकऱ्याच्या पाच शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची थरारक घटना घडल्याने हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.

बारड येथील लहुजी नगर भागातील गरीब शेतकरी माणिक नारायण कांबळे यांनी आपल्या घरासमोर पाच शेळ्या बांधल्या होत्या. काल रात्री दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक या शेळ्यांवर हल्ला चढवला. या दुर्दैवी घटनेत पाचही शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. आजच्या महागाईच्या काळात शेळ्यांचा बळी गेल्याने कांबळे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

घटना घडल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारडकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या घटनेची माहिती वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी येऊन पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी माणिक कांबळे यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी बारडकर यांनी केली आहे.

परिसरात बिबट्याची दहशत; शेतकरी चिंतेत

मुदखेड तालुक्यातील बारड, निवघा, डोंगरगाव, पार्डी आणि वैजापूर या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतात किंवा आखाड्यावर बांधलेली जनावरे, वासरे आणि पाळीव कुत्र्यांवर बिबट्यांचे हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ प्रचंड चिंतेत आहेत. बिबट्याच्या भीतीपोटी शेतात किंवा आखाड्यावर राखणीसाठी ‘सालगडी’ (शेतमजूर) राहण्यास तयार नाहीत. त्यामुळे वन विभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करून त्यांना पकडून मोठ्या जंगलात सोडावे, अशी उद्विग्न मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.