
महाराष्ट्रात गडचिरोलीमध्ये सर्पदंशामुळे तीन मुलींच्या मृत्यूबद्दल बोलताना, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले. दिल्लीतील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना, ते म्हणाले, गडचिरोलीत सर्पदंशामुळे झालेल्या तीन मुलींचा मृत्यू ही अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आमच्यासाठी आहे. गडचिरोलीतील धानोरा गावामध्ये आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन मुलींचा मृत्यू झाला आहे.
यासंदर्भात अधिक बोलताना राऊत म्हणाले, एकंदरीत सहा मुलींना सर्पदंश झाला तीन मुलींचा मृत्यू झाला. त्या आदिवासी मुलींना तातडीने उपचार मिळू शकले नाहीत. त्यानंतर उरलेल्या तीन मुलींना घाईघाईने नागपूरला हलवण्यात आले. आदिवासी पाड्यांवर आदिवासी आश्रमशाळांची अवस्था काय आहे याकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष आहे का? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. तसेच ते म्हणाले, आदिवासी मंत्री किंवा त्या विभागाचे पालकमंत्री ज्यांनी गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला आहे असे देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याला या देशातील स्टील सिटी बनवायला निघालेत आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे.
खाणी ज्या खाणमालकांना म्हणजेच उद्योजकांना दिल्या आहेत. ते जिंदालपासून असे अनेक जे भाजपचे मोठे देणगीदार आहेत. त्यांनी गडचिरोलीमधील जंगल तोडलंय त्यांनी गडचिरोलीमधील नद्या प्रदुषित केल्यात, डोंगर तोडलेत. त्यामुळे जल, जमिन जंगल ही जी आदिवासींची घोषणा आहे ती आता नाहीशी झाली आहे. आदिवासी विस्थापित झाला आहे. डोंगरावरचे प्राणी हिंस्त्र श्वापदं, सरपटणारे प्राणी आता घरात आणि शाळांमध्ये येऊ लागले आहेत असे यावेळी राऊत म्हणाले.
तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूने जर या राज्यातलं सरकार हळहळलं नसेल, अस्वस्थ झालं नसेल तर या सारखं निर्दयी सरकार नाही असे म्हणत संजय राऊतांनी सरकारला धारेवर धरलं. अधिक बोलताना ते म्हणाले, या राज्यातल्या सरकारी शाळा जिल्हापरीषदेच्या शाळा यांची अवस्था बघा. मी इथे आता आश्रम शाळेविषयी बोलतोय. काय त्यांना मिळतंय तुमच्या विकासामुळं. गडचिरोली जिल्ह्यात जो खाणउद्योग सुरू आहे तिथे जी लाखो वाहनं चालताहेत त्या वाहनांखाली गेल्या वर्षभरात दिडशे आदिवासी चिरडून मेलेत. त्यांचे मृतदेह सुद्धा गायब केले जातात.
एफआयआर नको म्हणून पाच मिनिटांत तो मृतदेह हलवला जातो आणि पाण्याचे फवारे मारून रक्त साफ केलं जातं असे यावेळी राऊत म्हणाले. यासंदर्भात अधिक भाष्य करताना राऊत म्हणाले, असे पंधराशे लोकं आत्तापर्यंत मेलेत.. मध्यंतरी काही लोक मला दिल्लीत येऊन भेटले. खाणमालकांच्या दबावाखाली मुख्य म्हणजे या मृत्यूंची नुकसानभरपाई द्यावी लागेल म्हणून, जिल्ह्याच्या ठिकाणी कुठेही नोंद नाही. आम्ही संसदेत हा मुद्दा उचलू पण राज्याचे मुख्यमंत्री काय करताहेत? आदिवासी विकास मंत्री काय करताहेत असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केला.
काय मिळतंय आदिवासींना असे म्हणत संजय राऊत म्हणाले, आदिवासींना विस्थापित केलं तुम्ही. कसला रोजगार आणताय? किती रोजगार मिळाले तिकडे? तुमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे देणगीदार जी तुम्हाला लाच देतात त्यांना तुम्ही गडचिरोलीचं जंगल, डोंगर, नद्या उद्धवस्त करायला दिलेलं आहे. आश्रमशाळांना जो निधी दिला जातोय तो कोण खातोय.. कोणाचे लोक आहेत हे. या तीन सर्पदंशाच्या घटना समोर आल्या, आत्तापर्यंत असंख्य मुलं आणि मुली विंचू आणि सर्पदंशाने मरण पावलेत. आदिवासी पाड्यांवर रुग्णवाहिका नाहीत झोळीमध्ये रुग्णांना न्यावं लागतंय. प्रेतं झोळीतून न्यावी लागताहेत. सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला लहान मुलांचा तर आई वडिलांना खांद्यावर ते प्रेत टाकून घरी न्यावं लागतंय. ही या राज्याची आदिवासी आणि आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे आहेत आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करताहेत. नरेंद्र मोदी विकासाच्या गोष्टी करताहेत. कुणाला तुम्ही मुर्ख बनवताय असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारी व्यवस्थेची पोलखोल केली.
तुम्ही नक्षलवाद संपवला म्हणता. पण म्हणून आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाहीयेत. ते अशा पद्धतीने मरताहेत. कसला विकास करत आहात तुम्ही? असा सवाल यावेळी राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोख करत विचारला. आदिवासींना साधे उपचार मिळत नाहीयेत साप विंचू चावल्यावर आणि तुम्ही गडचिरोलीची स्टील सिटी करायला निघालेले आहात असे म्हणत फडणवीसांना राऊतांनी सणसणीत टोला लगावला.
मी मुंबईत गेल्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. हे आदिवासींमधले जेन झी आहेत. आम्ही नागपूरला एका आंदोलनासाठी गेलेलो त्या भागातले पर्यावरण क्षेत्रातले कार्यकर्ते आले होते. तीन मुलींच्या मृत्यूने मी अस्वस्थ झालोय. महाराष्ट्रात आदिवासींचा मृत्यू सोपा झालाय असे राऊत म्हणाले. आदिवासी या भागाचे खरे भूमिपूत्र आहेत. झारखंड, छत्तीसगढ ओडिशामध्ये आदिवासींवर सुरू असलेले अत्याचार अत्यंत भयंकर आहेत. आदिवासींना सांगणारे साप पकडा आणि मंत्र्याच्या घरात सोडा. मग त्यांना कळेल मृत्यूचं भय काय असतं असंही यावेळी राऊत म्हणाले.
राज्यातल्या मंत्र्यांना काय फक्त सरकारी खर्चानं पोसायचं आहे का? असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केला. अधिक बोलताना ते म्हणाले, राजीनामा द्यायला हवा आदिवासी मंत्र्यांनी आणि तिथल्या पालकमंत्र्यांनी. खाणमालकांकडून फक्त हफ्ते घ्यायला जाता का तुम्ही. किती कोटी महिन्याला गडचिरोलीच्या कलेक्टरला, अधिकाऱ्याला, पालकमंत्र्यांना, आमदारांना जाताहेत आणि ही आदिवासी मूलं नाहक मरताहेत.
जरी तुम्ही विरोधी पक्षनेता विधानसभेत नेमला नाही तरी संजय राऊत हा त्या जनतेचा विरोधी पक्षनेता म्हणून आहे. मी गप्प बसणार नाही. या तीन मुलींच्या मृत्यूने मी खूप अस्वस्थ झालोय. आदिवासी आश्रमशाळांचे पैसे मंत्र्यांच्या खिशात जाताहेत. धर्मराव बाबा आत्राम नावाचे मंत्री आहेत ते काय करताहेत असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला. आदिवासींच्या रक्तावर तुम्ही पॅलेसमध्ये राहताय का.. असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आदिवासींच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत.. कुठे आहेत नरहरी झिरवाळ? असा प्रश्नही यावेळी राऊतांनी उपस्थित केला.



























































