
पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन करण्यासाठी पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा येथील प्रस्तावित गारगाई नदीवरील ‘आरसीसी’ धरण, जलवहन बोगदा व अनुषंगिक कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे. आयेसा इंडिया प्रा. लि. व मे. चॉईस कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. या संयुक्त उपक्रमाची निवड करण्यात आली आहे. या कंत्राटासाठी एकूण २४ कोटी १४ लाख ७९ हजार इतक्या खर्चाला प्रशासकीय व स्थायी समितीच्या मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
वाडा तालुक्यातील ओगदे गावानजिक गारगाई नदीवर ६९ मीटर उंच व ९७९.४ मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे. तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशयादरम्यान १.६ किमी लांबीचा जलवहन बोगदा उभारला जाईल. या प्रकल्पाद्वारे मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. देशात आरसीसी तंत्रज्ञानावर आधारित मर्यादित धरणे असल्याने पालिकेने आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बोली पद्धतीद्वारे सल्लागार नियुक्तीसाठी ई-निविदा मागविल्या होत्या.






























































