
पावसाळ्यात समुद्रकिनारी बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवण्यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे नौदलाच्या पाणबुड्यांना पाचारण करण्यात येते. बुडत्यांना वाचवण्याऱ्या नौदलाच्या पाणबुड्यांना २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पालिकेचे विमाकवच देण्यात येणार आहे. पालिका १० नौदल पाणबुड्यांचा प्रत्येकी ५० लाख रुपये याप्रमाणे एकूण पाच कोटींचा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचा विमा काढणार आहे. यासंदर्भातील १.२१ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे.
पालिकेने गेल्या वर्षी काढलेल्या विमा पॉलिसीची वैधता ११ मार्च २०२६ रोजी संपली. त्यामुळे चालू आर्थिक वर्षासाठी पॉलिसी काढण्यासाठी नौदलाने पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला कळवले. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने १० अनामिक पाणबुड्यांचा विमा काढण्यासाठी तयारी दर्शवली आहे. पाच कोटींचा विमा काढला जाणार असून त्याची प्रीमियम रक्कम प्रत्येकी १,२३,९०० रुपये एवढी आहे.
निविदा न काढता कंपनीची निवड
विम्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर निविदा काढली जाणार नाही. कारण निनावी विमा पॉलिसी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीशिवाय दुसरी कोणतीही कंपनी देत नाही, असे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.






























































