साताऱ्यात महामार्गावर कार उलटून ट्रकला धडकली; चौघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
accident

सातारा जिल्ह्यात मंगळवारी पहाटे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एका कारने रस्ता विभाजकाला धडक दिल्यानंतर ती उलटली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला, तर आणखी दोघे जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हा अपघात खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या सातारा-पुणे मार्गिकेवर पहाटे १.१० वाजता झाला आणि त्यामुळे या वर्दळीच्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला, असे त्यांनी सांगितले.

‘एक कार पुण्याहून साताऱ्याकडे जात होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कारने दुभाजकाला धडक दिली आणि ती उलटली. त्यानंतर ती विरुद्ध दिशेच्या रोडवर गेली आणि ट्रकला धडकली’, असे महामार्ग पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले.

कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची ओळख वेदांत अर्जुन वारिंगे (१९), सोनलिंग धिरेंद्र ठाकूर (१९), निखिल बाळू राऊत (२०) आणि आदित्य बाळासाहेब गरूड (१९) अशी पटली असून ते सर्व पुणे जिल्ह्यातील रहिवासी होते.

कारमधील इतर दोन प्रवासी, दोघेही २० वर्षांचे असून पुणे जिल्ह्यातील कामशेत येथील रहिवासी आहेत. ते जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. नंतर अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली आणि महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.