आझाद मैदान दंगल – 14 वर्षांनंतरही आरोपींना ना शिक्षा ना दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आझाद मैदानाजवळ असलेल्या अमर जवान स्मारकाची 11 ऑगस्ट 2012 रोजी विटंबना करण्यात आली होती. पोलिसांवर हल्ले करून त्यांच्या गाडय़ाही पेटवल्या होत्या. उद्या त्या घटनेला 14 वर्षे पूर्ण होतील, परंतु अजूनही आझाद मैदान दंगलीतील आरोपींना ना शिक्षा झाली ना दंड किंवा त्यांच्याकडून कोणतीही नुकसानभरपाईही घेतली गेलेली नाही.

म्यानमारमधील मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रझा अकादमी व अन्य मुस्लिम संघटनांनी आझाद मैदानात मोर्चा आयोजित केला होता. त्यातील प्रक्षोभक भाषणांमुळे त्या मोर्चाचे रूपांतर दंगलीत झाले. संतप्त जमावाने बंदोबस्तावरील पोलिसांवर हल्ले करत सार्वजनिक मालमत्तेची प्रचंड तोडपह्ड केली होती. याप्रकरणातील सर्व 60 आरोपी आज जामिनावर बाहेर मोकाट आहेत.

खटल्यांची सुनावणीही सुरू नाही

या दंगलीमुळे प्रारंभी पावणेदोन कोटी रुपये हानी झाल्याचे दाखवण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात न्यायालयात कागदपत्रे सादर करताना 36 लाख 44 हजार रुपये इतकी हानी दाखवण्यात आली; मात्र तीही वसूल करण्यात आली नाही. या खटल्यात अद्याप आरोप निश्चितीही झालेली नाही आणि त्यामुळे खटल्याची सुनावणीही सुरू झालेली नाही.