
शेतमालाला हमीभाव द्यावा, अपात्र वनदावे पात्र करावेत, कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द कराव्यात, यासह शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीटू, किसान सभेने दिंडोरी तहसील कार्यालयावर सोमवारी धडक देत ठिय्या आंदोलन केले. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत येथेच मुक्कामी थांबण्याचा निर्धार केला.
हजारो कामगार, शेतकरी, शेतमजुरांनी आज सकाळी दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा आणून ठिय्या दिला. सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांचा निषेध केला. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. सायंकाळी उशिरापर्यंत ठिय्या कायम होता.
या आंदोलनात माकपाचे सचिव देवीदास वाघ, तालुकाध्यक्ष रमेश चौधरी, आप्पा वटाणे, वसंत गांगोडे, विकास शिरसाट, संजय गांगोडे, हिरामण गायकवाड, लक्ष्मण देशमुख, विजय पाटील, सुवर्णा गांगोडे, लक्ष्मीबाई काळे यांच्यासह शेतकरी, कामगार मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
प्रमुख मागण्या काय!
- उत्पादन खर्चाच्या दीडपटीने सर्व पिकांना हमीभाव मिळावा.
- गायरान, इनामी, सरकारी जमिनींवरील सर्व निवासी व शेतीची अतिक्रमणे नियमित करावी.
- भांडवलदारधार्जिण्या कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात.
- खासगी उद्योग, शासकीय विभागातील पंत्राटी, शिकाऊ कामगारांना कायम करावे.
- स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, गावठाणातील फिडरवरील भारनियमन थांबवून चोवीस तास घरगुती वीजपुरवठा करावा.
- असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा कायदा लागू करावा.
- अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱयांना कायम करून सर्व लाभ द्यावेत.


























































