
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता ‘रेंटल पॉलिसी’अंतर्गत भाडय़ानेदेखील घरे उपलब्ध करून देणार आहे. शिरढोण येथील गृहप्रकल्पातील तब्बल 1150 घरे म्हाडा पेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच ‘सीआयएसएफ’ला भाडेतत्त्वावर देणार आहे. याच आठवडय़ात यासंदर्भात सामंजस्य करार (एमओयू) होणार आहे.
शिरढोणला अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी 18,692 घरे आणि 342 दुकाने उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पातील अत्यल्प उत्पन्न गटातील 1,905 घरे 2018 मध्ये तर 5,227 घरे 2025 मध्ये सोडतीद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथील बरीचशी घरे शिल्लक आहेत. आपल्या कर्मचाऱयांसाठी शिरढोण येथील घरे भाडेतत्त्वावर द्यावी, अशी मागणी सीआयएसएफने म्हाडाच्या कोकण मंडळाकडे केली होती. त्यानुसार कोकण मंडळाने याबाबतचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली असून याच आठवडय़ात सीआयएसएफ आणि म्हाडा यांच्यात सामंजस्य करार होणार आहे.
म्हाडा होणार मालामाल
शिरढोण येथील वन बीएचके फ्लॅटसाठी म्हाडा 8 हजार रुपये तर टू बीएचके फ्लॅटसाठी 13 हजार रुपये मासिक भाडे आकारणार आहे.याशिवाय प्रत्येक फ्लॅटमागे दोन महिन्यांचे भाडे डिपॉझिट म्हणून घेणार आहे. 12 वर्षांसाठी ही घरे भाडेतत्त्वावर दिली जाणार आहेत.


























































