आजी ओरडेल या भीतीने भावंडांनी घर सोडले, बेपत्ता मुलांना पोलिसांनी शोधून काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाडी साफ करण्यासाठी जास्त पाणी लागल्याने आजी ओरडेल या भीतीने दोन भावंडांनी घर सोडले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्यांना शोधून काढले. खेरवाडी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वांद्रे ज्ञानेश्वर नगर येथे दोन अल्पवयीन मुले त्याच्या आजीसोबत राहतात. त्याच्या आजीने त्यांना गाडी साफ करण्यास सांगितली. गाडी साफ करण्यासाठी त्याने जास्त पाण्याचा वापर केला. जास्त पाण्याचा वापर केल्याने आजी ओरडेल अशी त्या दोन भावंडांना भीती वाटली. त्यामुळे त्यांनी घरातून काही पैसे घेऊन घर सोडण्याचा निर्णय घेतला. नातवंड घरात न दिसल्याने त्याच्या आजीने खेरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक सुप्रिया पाटील यांच्या पथकातील पोलिसांनी तीन पथके तयार करून तपास करत मुलांना शोधून काढले.

बेपत्ता मुलगा राजस्थानमध्ये सापडला

इयत्ता नववीमध्ये शिकणारा मुलगा 6 ऑगस्टला शाळेत जातो असे सांगून घरातून बेपत्ता झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी पुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या मुलाला प्रवासाची फार आवड होती. अनेकदा तो शाळा बुडवून फिरण्यासाठी जात असे. उपनिरीक्षक ऐश्वर्या एताल यांनी शाळेशी संपर्क केला असता तो गेल्या तीन महिन्यांत फक्त नऊ दिवसच शाळेत आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केलेल्या तपासणीत तो मुलगा राजस्थानच्या कोटा येथे सापडला.