
खात्यांतर्गत उमेदवारांमधूनच कार्यकारी सहाय्यकांची 560 रिक्त पदे भरा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे.
मुंबई महापालिकेतील खात्यांतर्गत निम्न संवर्गातील पदवीधारक व विहित अर्हताधारी कर्मचाऱयांना कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदावर नियुक्ती देण्यासाठी परीक्षा घेण्यात आली. तब्बल 1178 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात 40 टक्के गुण व एकूण गुणांची बेरीज 45 टक्के आवश्यक होते. या निकषानुसार परीक्षेत 491 उमेदवार उत्तीर्ण झाले. नंतर प्रशासनाने गुण शिथिल करून, 326 अनुत्तीर्ण उमेदवारांना ‘कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदी नियुक्ती दिली. त्यामुळे एकूण 1178 पैकी 800 उमेदवारांना नियुक्ती दिल्यानंतर 560 पदे अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे परीक्षेला सामोरे गेलेल्या पदवीधारक व विविध अर्हताधारी कर्मचाऱ्यांमधूनच भरावीत, अशी मागणी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
जिल्हा न्यायालयातील पदांसाठी अट शिथिल करा
राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक पदांसाठी निम्न संवर्गातील उमेदवारांना एपूण गुण 35 टक्के व मागासवर्गीय उमेदवारांना 30 टक्के उत्तीर्ण गुणांची अट ठेवण्यात आली आहे. या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून रिक्त पदे भरण्यासाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यामध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी पुन्हा एकदा उत्तीर्ण गुणांची अट शिथिल करून, खात्यांतर्गत उमेदवारांमधूनच ‘कार्यकारी सहाय्यक’ (लिपिक) पदी नियुक्ती देण्यात यावी अशी आग्रही मागणी संघटनेने केली आहे.


























































