
मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा येथे सुरू करण्यात आलेला टोलनाका वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असताना आता प्रशासनाने अवघे काही किलोमीटर अंतर पुढे असलेल्या सुकेळीत टोलनाका उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. या महामार्गावर पळस्पे ते इंदापूरदरम्यानचे काम गेल्या १५ वर्षांपासून रखडले आहे. महामार्ग जरी खड्ड्यात असला तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलवसुलीची तयारी जोरात सुरू केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते इंदापूरदरम्यान चौपदरीकरणाचे काम २०११ मध्ये हाती घेण्यात आले. यादरम्यान सुमारे ८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे. मात्र १५ वर्षं होऊनही महामार्गाचे काम रखडले आहे. निधीची कमतरता, भूसंपादनाचे अडथळे आणि कंत्राटदारांची निष्क्रियता यामुळे हे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही. सद्यस्थितीत महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणी सर्व्हिस रोडची कामे पूर्ण झालेली नाहीत. मात्र असे असतानाही प्रवाशांना पहिल्या टप्प्यात टोल भरावा लागत आहे. खारपाडा येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. या टोलनाक्यावर तीन महिन्यांपासून टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. महामार्गावर वाहनांकडून ९५ रुपयांपासून पुढे वाहनाच्या प्रकारानुसार टोलवसुली सुरू आहे. यापुढे आता सुकेळी येथे टोलनाका उभारण्यात आला असून पुढील काही दिवसांत तिथेही टोलवसुली सुरू होणार आहे.
- रस्त्यावर अजूनही खड्डे, अपूर्ण पूल, वारंवार होणारी वाहतूककोंडी आणि अपुऱ्या सुविधा असताना प्रवाशांकडून टोल आकारला जात आहे.
- सुकेळी टोलनाका सुरू करू नये यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी माणगाव येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठकही झाली. या बैठकीतही टोलवसुलीला तीव्र विरोध करण्यात आला होता.
दोन टोलनाक्यांतील अंतर ६० ऐवजी ४७ किलोमीटर
सुकेळी खिंडीत उभारण्यात आलेला टोलनाका वादाच्या भोक्ऱ्यात सापडला आहे. टोलवसुलीची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर आता हा टोलनाका चुकीच्या ठिकाणी असल्याचा साक्षात्कार लोकप्रतिनिधींना झाला आहे. राष्ट्रीय महामार्गांवर दोन टोल नाक्यांमध्ये साधारण ६० किलोमीटरचे अंतर असावे, असा राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २००८ मधील निकष असताना खारपाड्यापासून अवघ्या ४७.७ किलोमीटर अंतरावर सुकेळी येथे टोलनाका उभारण्यात आला




























































