वाढदिवसाच्या केकमध्ये सापडली पाल; 11 जणांना विषबाधा, नालासोपाऱ्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढदिवसाच्या केकमध्ये मृत पाल आढळून आली असून हा केक खाल्ल्यामुळे ११ जणांना विषबाधा झाल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून विषबाधा झालेल्यांना विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दरम्यान ज्या चामुंडा डेअरीतील केक शॉपमधून हा केक खरेदी केला होता त्या दुकानाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. रुग्णालयात दाखल केलेल्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी नालासोपाऱ्यातील रहिवाशांमध्ये या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे.

नालासोपारा येथील नीलकंठेश्वर बिल्डिंगमध्ये शनिवारी एका मुलीच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी समोर असलेल्या चामुंडा डेअरी येथील केक शॉपमधून केक खरेदी करण्यात आला. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना उपस्थितांनी केक खाण्यास सुरुवात केली. त्यामध्ये मृत पाल आढळल्याचा दावा करण्यात आला. केकमध्ये पाल दिसताच उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर १० ते ११ जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यांना झाली विषबाधा
या घटनेत ऊर्मिला वर्मा, सलोनी गुप्ता, सुदिक्षा शाह, आफिया इद्रिस, रुबी शाह, शिव गुप्ता, प्रियांश वर्मा, परी यादव, प्रिया वर्मा, रुद्र शाह आणि प्राची यादव यांना विषबाधा झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान महापौर आजीव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन सर्वांची विचारपूस केली. तसेच या विषबाधा झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिका क्षेत्रातील हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे आदींची तपासणी करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.

नमुने प्रयोगशाळेत तपासणार
विषबाधेचे वृत्त समजताच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी श्री चामुंडा केक शॉपमध्ये जाऊन दुकानाची तपासणी केली. तसेच फ्रीजमध्ये ठेवलेल्या केकचे नमुनेदेखील ताब्यात घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.