मी मेंदूचा डॉक्टर; पण राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला! – डॉ. सुजय विखे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मी मेंदूचा डॉक्टर आहे; पण राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला,’ असा संताप व्यक्त करत, अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याचे माजी खासदार सुजय विखे यांनी मान्य केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत डॉ. सुजय विखे-पाटील सहभागी झाले होते.

रॅलीदरम्यान माध्यम प्रतिनिधींनी अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत डॉ. विखे यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, ‘या महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची जाणीव असून, डिसेंबरपर्यंत नागरिकांची यातून सुटका होईल,’ असा दावा त्यांनी केला.

या महामार्गाच्या कामातील दिरंगाईवर भाष्य करताना, ‘मी मेंदूचा डॉक्टर आहे; पण राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला,’ अशी टिप्पणी करत, युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराच्या उपलब्धतेवर परिणाम झाला असून, त्याचा विकासकामांवर परिणाम झाल्याचेही डॉ. विखे यांनी सांगितले.

दरम्यान, सिस्पे प्रकरणातील आरोपींना आपल्या कार्यकर्त्यांनी शोधून काढल्याचा दावा खासदार नीलेश लंके यांनी केल्याच्या पाश्र्वभूमीवर डॉ. सुजय विखे-पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. ‘डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, बल्कि ना मुमकिन था ! पण ही ना मुमकिन गोष्ट खासदारांनी केली असेल तर त्यांना नक्कीच ‘रॉ’चे अध्यक्ष करायला पाहिजे,’ असा टोला डॉ. सुजन विखे यांनी लगावला.