
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शनिवारी डीपीडीसीच्या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांकडून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांनी लेखी आश्वासन द्यावे, म्हणत शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघून पालकमंत्री नरहरी झिरवाळ सभागृहाच्या बाहेर पळून गेले. पालकमंत्री पळाल्याचे बघून इतरही लोकप्रतिनिधींनीही काढता पाय घेतला.
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शनिवारी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत डीपीडीसीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात घोषणाबाजी करत बैठकीत दाखल झाले. शेतकऱ्यांच्या घोषणांमुळे काही वेळासाठी मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर शेतकरी संदीप माटेगावकर यांनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना १ मे रोजी घेण्यात आलेल्या खरीप हंगामाच्या बैठकीदरम्यान शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत या मार्गामुळे बागायती पट्टा संपुष्टात येऊन शेकडो शेतकरी भूमिहीन होणार असल्याचे निदर्शनास आणून देत महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.
त्यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांनी शक्तिपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीची बैठक लावणार असल्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. या आश्वासनाचे काय झाले ? असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना चांगलेच धारेवर धरले होते.
शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या बाजूने लोकप्रतिनिधी असतील आणि शेतकरी जमीन मोजणीला विरोध करत असतील तर जिल्हा प्रशासन मोजणीसाठी का हट्ट करत आहे? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत तीव्र घोषणाबाजी करत पालकमंत्र्यांसमोर येत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पालकमंत्र्यांनी लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी लावून धरली. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघून गडबडून गेलेल्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहाच्या बाहेर पळ काढला. त्यानंतर शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू केली. पालकमंत्री पळाल्याचे बघून इतरही लोकप्रतिनिधींनीही काढता पाय घेत सभागृहाबाहेर निघून गेल्याचे पाहाव्यास मिळाले.



























































