
विरार पूर्वेकडील एचडीआयएल पार्कच्या औद्योगिक परिसरातील अगरबत्ती बनविणाऱ्या कंपनीला सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे मोठे लोट आणि धुराचे प्रमाण पाहून परिसरातील नागरिकांसह लगतच्या कंपन्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आगीची माहिती मिळताच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. कंपनीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे नेमके कारण तसेच नुकसानीचा अंतिम आकडा अग्निशमन विभागाच्या पाहणीनंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे जवान युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून, घटनेची अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.



























































