
‘द फायनल एक्झिट’, ‘घोस्ट’, ‘7 अवर्स टू गो’ यासह तेलुगु चित्रपटांमध्ये काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या राज हिचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. जुलै महिन्यात तिचे निधन झाले असून तब्बल महिन्याभरानंतर कुटुंबाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. वर्षभरापासून ती शारीरिक आणि मानसिक आरोग्याने त्रस्त होती. 15 जुलै रोजी पहाटे झोपेतच तिची प्राणज्योत मालवली, अशी माहिती तिच्या कुटुंबाने दिली आहे.
आम्ही अनन्याचे कुटुंब आहोत. अत्यंत दुःखाने आम्हाला सांगावे लागत आहे की, 15 जुलै रोजी पहाटे अनन्याचे निधन झाले. झोपेतच तिने शांतपणे जगाचा निरोप घेतला. गेल्या एका वर्षाहून अधिक काळापासून ती शारीरिक आणि मानसिक त्रासाचा सामना करत होती. या परिस्थितीत ती एका योद्ध्यासारखी लढली, असे तिच्या कुटुंबाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ती अत्यंत खंबीर विचारांची मुलगी होती आणि राणीसारखी जगली. बाळा, तुझी उणीव आम्हाला नेहमी भासेल. आम्ही सर्वांना तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती करतो. या कठीण काळात आम्हाला खाजगीपणा आणि शांतता हवी आहे, असेही तिच्या कुटुंबाने म्हटले. ‘एएनआय‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
View this post on Instagram
मुंबईत लहानाची मोठी झालेल्या अनन्याने मॉडेलिंग आणि म्युझिक व्हिडिओंच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2016मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘7 अवर्स टू गो’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने 2017 मध्ये ‘द फायनल एक्झिट’ आणि 2019 मध्ये ‘गोस्ट’ या चित्रपटांमध्ये काम केले.
हिंदीसोबतच तिने प्रादेशिक चित्रपटसृष्टीतही काम केले. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थग्गेदे ले’ या तेलुगू सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटात तिने नवीन चंद्रा, दिव्या पिल्लई आणि पी. रवी शंकर यांच्यासोबत काम केले होते. याशिवाय तिने ‘मद्रासी गँग’ या त्रिभाषिक चित्रपटातही भूमिका साकारली होती.



























































