चूक NTA ची, पण शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना; यूजीसी-नेटच्या 3 विषयांची परीक्षा रद्द केल्यामुळे राहुल गांधींचा संताप, मोदींवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता (यूजीसी-नेट) चाचणीच्या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) केली. ‘नीट’नंतर एनटीएवर यंदाच्या वर्षात दुसऱ्यादा अशी नामुष्की ओढवली असून यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला.

मोदीजी, तुमच्या एनटीएने नुकतेच काय केले आहे ते जरा पाहा. यूजीसी-नेटच्या समाजशास्त्र, इंग्रजी आणि वाणिज्य या विषयांच्या परीक्षा 22 ते 30 जूनदरम्यान घेण्यात आल्या. जवळपास दोन महिन्यांनंतर एनटीएने या तिन्ही परीक्षा रद्द केल्या, कारण त्यांच्याकडून चुकीची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली आणि जुन्या प्रश्नांची पुनरावृत्ती करण्यात आली. हजारो उमेदवारांनी अनेक वर्षे तयारी केली, अर्ज भरले, शुल्क भरले, दूरच्या परीक्षा केंद्रांवर प्रवास केला. आता त्यांना सप्टेंबरमध्ये पुन्हा हे सगळे करावे लागणार आहे. चूक एनटीएची, पण शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

मी हे कोटामध्ये, डेहराडूनमध्ये, प्रयागराजमध्ये सांगितले आहे आणि पुढेही सांगत राहीन. ही आता शिक्षणव्यवस्था राहिलेली नाही. हे एक ‘एक्स्ट्रॅक्शन मशीन’ बनले आहे. ते तुमचे पैसे, तुमची वर्षे, तुमचे मानसिक आरोग्य आणि तुमचा आत्मविश्वास हिरावून घेते आणि बदल्यात काहीच देत नाही. नोकरीसुद्धा नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच परीक्षा होण्यापूर्वीच या प्रश्नपत्रिका लीक झाल्या होत्या का? या प्रश्नाचे उत्तरही एनटीएने दिलेले नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

मोदी सरकारच्या इतर प्रत्येक यंत्रणेप्रमाणेच एनटीए देखील कधीही स्वतःची चूक मान्य करत नाही आणि इतर प्रत्येक पेपरफुटीच्या प्रकरणाप्रमाणेच, यामध्येही कोणाचीही जबाबदारी निश्चित केली जाणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही पहिली पायरी होती, शेवटची नाही. एनटीएच्या नेतृत्वालाही जबाबदार धरले पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.

यूजीसी-नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द, पुन्हा नामुष्की

सप्टेंबरमध्ये पुन्हा ही परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, तुमची काहीही चूक नाही. पंतप्रधान मोदींनी अशी व्यवस्था उभी केली आहे जी एक परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही आणि त्यानंतर त्याच परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाच दोष देते. तुमची वर्षे हिरावून घेतली जात आहेत आणि जोपर्यंत पंतप्रधान मोदी याचे उत्तर देत नाहीत, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असा हुंकारही राहुल गांधी यांनी भरला.