
मराठी कवितेच्या कोलाहलात स्वतःचा सूर सापडलेले जे थोडे कवी आहेत त्यात द. भा. धामणस्कर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. आधुनिक मराठी कवितेचा फार मोठा काळ त्यांनी केवळ बघितला नाही तर प्रत्यक्ष अनुभवला. अनेक प्रवाह आले आणि गेले, पण धामणस्कर यांच्या कवितेचा सूर जराही हलला नाही. तो आयुष्यभर काव्यसाधना करीत राहिला. सुमारे ऐंशी वर्षे ते कविता लिहीत होते. या कालखंडात अनेक भौतिक बदल झाले. विज्ञान-तंत्रज्ञान बदलले. कागदाची जागा स्क्रीनने घेतली. पण तरीही दभांनी निसर्गाशी जोडलेली नाळ जराही तुटू दिली नाही.
बालकवींच्या परंपरेतील या कवीने आपला टवटवीतपणा जपत समाजव्यवस्थेवरही कोरडे ओढले. दत्तात्रेय भास्कर धामणस्कर हे डोंबिवलीत काही वर्षांपूवी राहायला आले आणि ते तेथील सांस्कृतिक, साहित्यिक वातावरणाचा एक भाग बनून गेले. आदराने अवघा महाराष्ट्र त्यांना ‘आबा’ म्हणायचा. कुसुमाग्रज, पाडगावकर, करंदीकर, शंकर वैद्य, बोरकर अशा अनेक दिग्गजांशी त्यांचा अतिशय जवळचा स्नेह होता. बोरकर तर त्यांना ‘पोएट धामणस्कर’ अशी हाक मारायचे. अनेक कवींचे दभा हे मार्गदर्शक, गुरू होते. ‘मी माणसांच्या दुःखाचा कवी आहे’ असे धामणस्कर नेहमी म्हणायचे. ‘झाडे सत्तेवर आली तर’, ‘पंदील विकणारी मुले’ अशा अनेक कवितांमधून त्याची साक्ष पटते. काव्यवाचनाचे भव्य सोहळे, साहित्य संमेलन, सोशल मीडिया यात ते कधीच रमले नाहीत. साहित्य संस्था आणि साहित्यिकांच्या राजकारणापासूनही ते नेहमीच लांब राहिले. म्हणून ते स्वतःची वेगळी कविता लिहू शकले. तसे बघायला गेले तर त्यांचे फक्त तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. 1982 साली ‘प्राक्तनाचे संदर्भ’ हा पहिला संग्रह ‘मौज’ ने प्रसिद्ध केला. हा संग्रह साहित्य क्षेत्रात अतिशय गाजला. ‘हस्तांतर’, ‘वही मोकळी करताना’ या कवितांनीं दभांना एका उंचीवर नेऊन ठेवले. ‘भरून आलेले आभाळ’ हा तिसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला तेव्हा त्यांचे वय होते 86. तरी त्यांच्या कवितांमधील ताजेपणा तेवढाच टवटवीत होता. साठोत्तरी कवितेचा नेहमी अनेकदा उल्लेख केला जातो. साहित्य अकादमीच्या ‘साठोत्तरी मराठी कविता’ या खंडामध्ये त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला होता.
1980 साली ‘ग्रंथाली’ ने दशकातील दहा महत्त्वाच्या कवींचा शोध घेतला होता. या उपक्रमासाठीदेखील धामणस्कर यांची निवड करण्यात आली. प्रा. शंकर वैद्य नेहमी म्हणायचे की, कविता लिहिणे म्हणजे मोठी जोखीम असते. ही जोखीम दभांनी अतिशय समर्थपणे पेलली होती. ‘विसर्जनासाठी गणपती नेताना’ या कवितेने त्यांना एका उंचीवर नेऊन ठेवले होते. एका पिढीची पंरपरा दुसऱ्या पिढीकडे सोपवताना निर्माण झालेली भावना आणि विचार त्यांनी अतिशय सुंदरपणे या कवितेतून मांडले आहेत. ‘वस्तू’ या त्यांच्या एका कवितेचा समावेश दहावीच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आला. धामणस्कर यांनी नव्वदीमध्ये पदार्पण केले होते तेव्हा ज्येष्ठ कवी नारायण लाळे व राजीव जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. कवितेबद्दलचे विचार मांडताना ते म्हणाले होते ‘माझ्या कवितेने मला जगवले आहे आणि माझी कविताच मला जगवणार आहे. मी केवळ स्वतःच्या आनंदासाठी कविता लिहितो.
आपल्याला आलेली सुखाची, दुखाःची, प्रेमाची, करुणेची, आशेची, निराशेची, विस्मयाची अनुभूती आपल्या शब्दांतून जशीच्या तशी व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे, असे मी मानतो. कविता लिहिताना मीच माझा कठोर टीकाकार असतो. ‘हळूवारपणा, भावोत्कटता, मानवता, सच्चेपणा असे अनेक गुण त्यांच्या कवितेत आढळतात. कवितेतील आर्तता, करुणा आणि प्रेम तर त्यांच्या प्रत्येक कवितेत दिसून येते. अध्यात्म हा तर त्यांचा आत्मा. ‘कावळा’ या कवितेत त्याची साक्ष पटते. ‘फुलून आले झाड’ या कवितेत ते म्हणतातŠ
सरता सरता दिवस शेवटी
फुलून आले झाड
ओंजळीत फांद्यांच्या हलके
कोसळले ब्रम्हांड…
विस्मित झाडा न कळे कुठली
नसांत ताकद जागे
उभे बावरे चिंब; थरथरे
अस्तित्वच पण अवघे
द. भा. धामणस्कर यांनी लिहिलेल्या कवितांची संख्या फार नसली तरी त्यातील दर्जेदारपणा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांच्या कवितांचा विचार केल्याशिवाय मराठी कवितेचा आधुनिक कालखंड हा पूर्ण होऊ शकत नाही. झगमगाटापासून दूर असलेली अंतस्थ कविता ही वाचणाऱ्याला अंतर्मुख करून टाकते. त्यांची कविता वाचली आणि सोडून दिली असे होत नाही. या उलट मनात अस्वस्थता निर्माण होते. त्यांची कविता ही विचार करायला भाग पाडते. समष्टीचा शोध घेणारी ही कविता मराठीच्या काव्यप्रवासातील मैलाचा दगड ठरली आहे. त्यांच्या मौनातही कविता दिसून यायची. खरी कविता शब्दांच्या पलीकडे असते. त्याचाच शोध दभांनी घेतला. त्यांची आत्मशोधपर कविता ही अनेक पिढय़ांना मार्गदर्शन करणारी, उजेड देणारी ठरणार आहे. समीक्षकांनी त्यांच्या कवितेवर अन्याय केला असला तरी सच्चा काव्यसाधक मात्र दभांना कधीच विसरणार नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तरŠ
दिवे असावे कोमल हळवे
अंधाराहून उजळ जरासे…





























































