
केंद्रातील भाजप नेतृत्वाखालील एनडीए सरकारने केवळ दिल्लीतून निर्णय घेणे बंद केले पाहिजे. देशातील सर्व मोठे उद्योग, तंत्रज्ञान प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा केवळ एकाच राज्यात म्हणजे गुजरातमध्येच कशा काय जातात. हे तर ‘गुजरातकेंद्रित’ विकास मॉडेल आहे, अशा शब्दांत के. अन्नामलाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली.
तामीळनाडू विधानसभा निवडणुकीत पक्षाला समाधानकारक कामगिरी करता न आल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ‘वी द लीडर्स’ ही नवी चळवळ सुरू केली आहे. या चळवळीचे राजकीय पक्षात रूपांतर करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. एका विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्राच्या धोरणावर जोरदार हल्ला चढवला. केंद्राने सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे. दोन गुजराती सर्वोच्च स्थानी आहेत, असे म्हणत त्यांनी देशातील प्रादेशिक अस्मिता आणि केंद्रीय धोरणांमधील असंतुलनावर तसेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर आणि देशातील विकासाच्या असमान वाटपावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. देशातील प्रत्येक राज्याला विकासाची समान संधी मिळणे गरजेचे आहे. सर्व मोठय़ा संधी आणि प्रकल्प एकाच राज्यात केंद्रित होत असल्याकडे जनता बारीक लक्ष ठेवून आहे, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
दिल्लीतून निर्णय लादणे दुर्दैवी
भाजपमधील निर्णयप्रक्रिया पूर्णपणे दिल्लीकेंद्रित झाली असल्याचा थेट आरोप अन्नामलाई यांनी केला. भाजपचे सर्व महत्त्वाचे निर्णय आता दिल्लीतूनच घेतले जात आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही पद्धत आता बदलायलाच हवी, असे ते म्हणाले. राज्यस्तरीय नेत्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे अधिकार आणि स्वातंत्र्य मिळायला हवे, असेही ते म्हणाले.
सर्व राज्यांना समान वागणूक द्या
देश एकत्र आणि संघटित ठेवायचा असेल, तर केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान दर्जा व संधी दिली पाहिजे, असे ते म्हणाले. देशातील बहुतांश मोठय़ा क्रीडा स्पर्धा आणि महत्त्वाचे उपक्रम केवळ एकाच ठिकाणी, म्हणजे अहमदाबादमध्ये आयोजित केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला.



























































