शिवसेनेच्या नेतृत्वात नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात प्रचंड जनआक्रोश; खड्डे अपघातांतील मृत्यू हे खूनच! महापालिका आणि महाजनांवर हत्येचे गुन्हे दाखल करा!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक शहराला ‘खड्डय़ात’ घालणाऱ्या व दहा निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या महापालिकेच्या कारभाराविरोधात आज प्रचंड जनआक्रोश उसळला. सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट व बेफिकीर कारभाराचा जाब विचारण्यासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा महापालिकेवर धडकला. शिवसैनिकांबरोबरच हजारो नाशिककर या मोर्चात सहभागी झाले होते. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणांनी मोर्चेकऱ्यांनी आसमंत दणाणून सोडला. ‘‘खड्डे अपघातातील मृत्यू हे खूनच आहेत. त्यासाठी जबाबदार असलेली महापालिका व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हत्येचे गुन्हे दाखल करा,’’ अशी जोरदार मागणी संजय राऊत यांनी केली. ‘‘महाजन हटवा, नाशिक वाचवा’ असे म्हणत नाशिककरांनी त्यास एकमुखी प्रतिसाद दिला.

शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात महिला व तरुणांचा लक्षणीय सहभाग होता. सत्ताधाऱ्यांचा निषेध म्हणून बहुतेक मोर्चेकऱ्यांनी काळे कपडे परिधान केले होते. ‘कामात भ्रष्टाचार, रस्त्यावर खड्डे, याला जबाबदार कोण?’, ‘अधिकाऱ्यांची खुर्ची हलवा, नाशिक वाचवा’, ‘रस्ते खराब, कारभार बेहाल, सरकार कुठे आहे?’, ‘खड्डे करतात विकासाची पोलखोल’, ‘निष्क्रिय सत्ताधाऱ्यांना हटवा, नाशिक वाचवा’, ‘नाशिककरांचा संयम संपला, जनआक्रोश झाला’ असे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सीबीएसमार्गे हा मोर्चा महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयावर धडकला.

पालिकेच्या प्रवेशद्वारावर झालेल्या सभेत बोलताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. ‘‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने निघालेला हा मोर्चा नाशिककरांच्या आयुष्यातील खड्डे बुजवण्यासाठी आहे. सत्ताधारी आणि आयुक्तांकडे संवेदना शिल्लक असेल तर मोर्चाच्या व्यासपीठावर येऊन त्यांनी निवेदन स्वीकारावे. या मोर्चात आम्ही यमालाही बोलावले आहे. आता नागरिकांचे बळी घ्यायचे नाहीत, महापालिकेत बसलेल्या भ्रष्ट निष्ठुरांवर रेडा सोडायला हवा,’’ असा टोला संजय राऊत यांनी हाणला. ‘‘आम्ही जनतेसाठी कर्तव्य भावनेतून रस्त्यावर उतरलो आहोत, तर सत्ताधारी भाजप-मिंधे गट घरात लपून बसले आहेत,’’ अशी टीका केली. खड्डे अपघातात मरण पावलेल्या नागरिकांची नावेही संजय राऊत यांनी वाचून दाखवली. ‘‘खड्ड्यांमुळे गेलेले बळी हे सत्ताधारी व प्रशासनाने केलेले खून आहेत. महापालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा मंत्री महाजन यांच्याविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही,’’ असा इशारा त्यांनी दिला. शहर कधीपर्यंत खड्डेमुक्त होईल याची कालमर्यादा सत्ताधाऱ्यांनी सांगावी, अन्यथा शिवसेना पुन्हा महापालिकेवर धडक देईल, शिवसैनिक गेट तोडून आत घुसतील,’’ असेही त्यांनी ठणकावले. जिल्हा संपर्क उपनेते रवींद्र मिर्लेकर, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महापालिका गटनेते केशव पोरजे यांचीही भाषणे झाली.

सत्ताधारी नगरसेवकांना खड्डय़ात टाका

‘‘मखमलाबादच्या रस्त्यावर स्विमिंग पुलासारखे खड्डे पडलेत. त्यात भाजपचे आणि मिंधे गटाच्या नगरसेवकांना टाकले पाहिजे. हे सगळे पन्नास खोकेवाले आहेत, यांना पन्नास कोटी मिळतात. जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना मात्र दोन-पाच लाख रुपये देतात,’’ असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. ‘‘भाजपच्या लोकांनी अयोध्येच्या मंदिरातील दानपेटी लुटली. सीतामाईचे अलंकार, मंगळसूत्रं लुटली. त्याच भाजपची पिलावळ नाशिकलाही लुटत आहे. ज्यांनी अयोध्येतील प्रभूरामाला सोडले नाही, ते पंचवटीतील रामाला काय सोडणार?’ असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला.

टॉयलेटचेही पैसे खायला लागलेत

मोर्चाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. ‘‘नाशिक दत्तक घेतल्याचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला का,’’ असा सवाल त्यांनी केला. ‘‘नागरिक समस्यांनी त्रस्त असताना सरकार कुंभकर्णाच्या भूमिकेत आहे. इकडचे पालकमंत्री, कुंभमेळा मंत्री त्यांना कुंभकर्ण मंत्री म्हटलं पाहिजे,’’ असा टोला त्यांनी हाणला. ‘‘कुंभमेळ्याचे बजेट 15 हजार कोटींवरून 45 हजार कोटींवर गेलं आहे. आता 55 हजार टॉयलेट बांधणार आहेत, त्यापैकी 10 हजार व्हीआयपी टॉयलेट असतील, हा काय प्रकार आहे? हे लोक टॉयलेटचेही पैसे खायला लागले आहेत,’’ अशी टीका संजय राऊत यांनी केली.

शिवसेनेच्या मागण्या

शहरातील खड्डे तातडीने बुजवा.

अपूर्ण व निकृष्ट कामांना जबाबदार असलेल्या अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा.

खड्डे अपघात व मृत्यूंची अधिकृत माहिती जाहीर करा.

प्रत्येक प्रभागातील रस्त्यांची पाहणी करून धोकादायक ठिकाणांची यादी सार्वजनिक करा.

खड्डे बुजविण्यासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करा.

रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक पथक नियुक्त करा.

खड्डे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 कोटी व जखमींना 50 लाखांची भरपाई द्या.

जनआक्रोश मोर्चात यमाचा रेडाही अवतरला. त्याच्या पाठीवर ‘यमदूत-मुक्काम पोस्ट नाशिक’ असे लिहिलेले होते. हा यमराज म्हणजे महापालिकेत व जिह्यात फिरणाऱ्या मानवरूपी यमराजाचे प्रतीक आहे, अशी संतप्त भावना यमराजाच्या वेषातील तरुणाने व्यक्त केली.