
सोशल मीडियात संशयकल्लोळ निर्माण करणाऱ्या अंधभक्तांना कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आज टोला हाणला. ‘बोस्टन विद्यापीठाची माझी डिग्री दाखवायला मी तयार आहे, पण तुमच्या ‘पॉपॉ’कडे लोकांनी पदवी प्रमाणपत्र मागितले तर काय होईल,’ असे दीपके यांनी सुनावले. ‘मी माझी पदवी दाखवायला बसलोच आहे. अंधभक्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांची डिग्री दाखवायला सांगावी’, असे आव्हानच त्यांनी दिले.
‘नीट’ पेपरफुटीविरोधात जेन-झींचे यशस्वी आंदोलन उभारून शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडणाऱ्या दीपके यांना भाजप समर्थकांकडून सातत्याने लक्ष्य केले जात आहे. दीपके यांच्या उत्पन्नाबद्दल आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यासाठी पॉडकास्ट केले जात आहेत. लेख लिहिले जात आहेत. दीपके हे कधी बोस्टनला गेलेच नाहीत. त्यांच्याकडे कुठलीही डिग्री नाही. ते फ्रॉड आहेत. खोटारडे आहेत, असे सांगितले जात आहे. या सगळ्याचा संदर्भ देत दीपके यांनी ‘एक्स’वर व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अंधभक्तांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
दिल्ली विद्यापीठाला मोदींचा अभिमान का वाटत नाही?
दीपके यांनी दुसऱ्या एका ‘एक्स’ पोस्टमध्ये दिल्ली विद्यापीठालाही टोला हाणला. ‘बोस्टन विद्यापीठाने मी त्यांचा माजी विद्यार्थी असल्याबद्दल माझ्याविषयी एक लेख प्रकाशित केला होता. दिल्ली विद्यापीठाला मोदी हे त्यांचे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटला पाहिजे. शेवटी, ते हिंदुस्थानचे पंतप्रधान आहेत. त्यांची पदवी लपवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी विद्यापीठाने ती अभिमानाने मिरवायला नको का?’ असा खोचक सवालही दीपके यांनी केला.




























































