
बॉलिवूडमधील ढाई किलो का हाथ या डायलाॅगमुळे प्रसिद्ध झालेला, अभिनेता सनी देओलने गुटखा आणि पान मसाल्याच्या जाहिराती करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचे नुकतेच सांगितले आहे. अशा जाहिरातींच्या अनेक ऑफर्स आपल्याला आल्याचे सांगत, केवळ पैशांसाठी आपल्या तत्त्वांशी तडजोड करायची नसल्याचे सनी देओलने स्पष्ट केले. एका पॉडकास्टमध्ये बोलताना सनी म्हणाला की, “मी पान मसाल्याची जाहिरात करत नाही आणि कधीही करणार नाही. मी गुटख्यासारख्या गोष्टींचा प्रचार करणार नाही. मला ऑफर्स येतात, पण मी करणार नाही.” ज्या गोष्टींवर आपला विश्वास नाही, त्यांचा प्रचार करणे योग्य वाटत नसल्याचेही त्याने सांगितले.
एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार सनी देओलच्या मते, एखाद्या जाहिरातीसाठी मोठी रक्कम मिळत असली तरी मनाची तयारी नसेल, तर ती ऑफर स्वीकारण्यात अर्थ नाही. मी पैशांसाठी काही करण्याचा प्रयत्न केला, तरी माझे मन मला मागे खेचते. मी हे का करत आहे? मी हे कोणासाठी करत आहे? मला हे फक्त पैशांसाठी करायचे आहे का? असे प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर त्या निर्णयापासून मागे हटतो, असे त्याने सांगितले.
सनी देओलने पुढे म्हटले की, आयुष्यात प्रत्येक गोष्ट केवळ पैशांसाठी करण्याचा त्याचा दृष्टिकोन नाही. काही निर्णय घेताना आपली सद्सद्विवेकबुद्धी आणि मूल्ये महत्त्वाची असल्याचे त्याने स्पष्ट केले. त्यामुळेच गुटखा किंवा पान मसाल्यासारख्या उत्पादनांच्या जाहिरातींच्या आकर्षक ऑफर्स असूनही त्याने त्या स्वीकारल्या नाहीत.
दरम्यान, सनी देओलच्या या वक्तव्याची चर्चा अशा वेळी होत आहे, जेव्हा पान मसाल्याच्या जाहिरातींवरून बॉलिवूडमधील काही मोठ्या कलाकारांवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाची कारवाई झाली आहे. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमनल वेलचीच्या जाहिरातीसंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या जाहिरातीमधून प्रतिबंधित पान मसाला उत्पादनाचा अप्रत्यक्ष किंवा ‘सरोगेट’ प्रचार होत असल्याचा FDAचा आक्षेप आहे.


























































