
महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात १० इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. तांत्रिक तपासणी आणि आरटीओ विभागाची परवानगी मिळाल्यानंतर या बसेस धावणार आहेत. या नवीन बसेसचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले असून उर्वरित ९० बसेस लवकरच टप्प्याटप्प्याने ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेंतर्गत ठाणे परिवहन सेवेला दोन वर्षांपूर्वीच १०० इलेक्ट्रिक बस मिळणार होत्या. मात्र विविध कारणांमुळे या बस दाखल होण्यास विलंब झाला. गेल्या वर्षी १५ ऑगस्टला २५ बस ताफ्यात दाखल होण्याची शक्यता होती. मात्र पडताळणीदरम्यान बसमध्ये काही तांत्रिक अडचणी आढळल्याने बसेसचे आगमन लांबले.
तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर बसची पुन्हा चाचणी घेण्यात आली. याच प्रक्रियेंतर्गत यावर्षी ७ फेब्रुवारीला दोन इलेक्ट्रिक बस ठाणे परिवहन सेवेत दाखल करून त्यांची विविध मार्गांवर चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा दहा बसेस ताफ्यात आल्याने ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना
नवीन बसेसमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी पहिल्या टप्प्यातील १० इलेक्ट्रिक बस ठाणे शहरात दाखल झाल्या आहेत. उर्वरित बसही विविध टप्प्यांत सेवेत दाखल झाल्यानंतर ठाणेकरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचे टीएमटी व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सांगितले.



























































