
गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमशान घातले असतानाच आता कल्याण ग्रामीणवासीयांना टायफाईड, डेंग्यू, मलेरियाचा दंश बसू लागला आहे. आठ महिन्यांत टायफाईडचे १०७, डेंग्यूचे २३ तर मलेरियाचे २६ रुग्ण आढळले आहेत. खासगी रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्येही उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अर्लट मोडवर आली आहे. ताप आल्यास तत्काळ रक्ताची तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन गावागावात केले जात आहे.
जूनमध्ये मान्सूनला सुरुवात झाली की व्हायरल तापासह डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, लेप्टो स्पायरोसिस, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया आदी आजारांची लागण होत असल्याचे दिसून येते. यंदाच्या पावसाळ्यातही या साथीच्या आजारांनी डोके वर काढले. तापासह डेंग्यू, मलेरिया, टायफाईडचे रुग्ण आढळले आहेत. ऊन-पावसाच्या खेळामुळे वातावरणात झालेल्या बदलात तापाचे रुग्ण वाढले आहेत. १ जानेवारी ते आतापर्यंत टायफाईडचे १०७, डेंग्यूचे २३ तर मलेरियाचे २६ रुग्ण आढळले आहेत. त्यात व्हायरल तापाचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
दोन पदे रिक्त
कल्याण तालुक्यातील ६० ते ६५ गावांसाठी एकमेव गोवेली ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात तीस बेडची सोय आहे. रुग्णालयात मंजूर पदे २९ असून २७ पदे भरलेली आहेत. यातील दोन पदे रिक्त आहेत. साथीच्या आजारांमुळे रोज अडीचशे रुग्णांच्या उपचारासाठी रांगा लागतात. टायफाईड रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी आम्ही रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना सेवा देतो. रुग्णालयाचे बांधकाम बाकी आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपलक्ष्मी मेश्राम यांनी सांगितले.



























































