
देशभरात सुरू असलेल्या जनगणना आणि सर्वेक्षण प्रक्रियेत इतर मागासवर्गीय (ओबीसी) नागरिकांसाठी स्वतंत्र रकाना नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे ओबीसीची अचूक आकडेवारी समोर येणार नसल्याने ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. जनगणनेच्या अर्जात तातडीने ओबीसी रकान्याचा समावेश करावा, अन्यथा दिल्लीमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे.
गावागावांत प्रशासनाकडून जनगणना सर्वेक्षण सुरू आहे. या प्रक्रियेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठीच स्वतंत्र नोंदीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी कोणताही रकाना तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे ओबीसींची गणना सामान्य प्रवर्गात किंवा इतर स्तरावर होत आहे. जर अशा पद्धतीने जनगणना झाली तर देशात आणि राज्यात ओबीसींची संख्या किती आहे याची नोंद होणार नाही, अशी खंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोकण विभाग अध्यक्ष एकनाथ तारमळे यांनी व्यक्त केली आहे.
…तर सर्वेक्षणावर बहिष्कार
जनगणना सर्वेक्षणात ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना जर टाकण्यात आला नाही तर सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. केंद्र सरकारने ओबीसींसह जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार गॅझेट दुरुस्तीसह काढावे. ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी नाही तर येत्या हिवाळी अधिवेशनात दिल्ली येथे रामलीला मैदानावर जोरदार ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एकनाथ तारमळे यांनी दिला आहे.






























































