
झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे आणि गैरव्यवहाराच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. विद्यार्थ्यांपुढे राज्य सरकारने नमते घेत 2014 पासून टीडीपीएल या कंपनीद्वारे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा आणि त्यांचे निकाल रद्द करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयांतर 16 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आंदोलक देवेंद्र महतो यांच्यासह इतर विद्यार्थी नेत्यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, परीक्षा घोटाळ्यांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी व्हावी, या मुख्य मागणीवर विद्यार्थ्यांचा एक गट अजूनही ठाम असून आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आरोग्यमंत्री इरफान अन्सारी, मंत्री दीपिका पांडे आणि आमदार जयराम महतो यांच्या संयुक्त मध्यस्थीनंतर देवेंद्र महतो, उम्मे हबीबा आणि राहुल क्रांती यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले. आम्ही सनदशीर आणि शांततापूर्ण मार्गाने लढलो. विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही, असा कडक कायदा विधानसभेत संमत करून सरकारने सुरक्षेची हमी द्यावी, असे देवेंद्र महतो उपोषण मागे घेताना म्हणाले. नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झालेल्या परीक्षा रद्द करणे सोपे नव्हते, तरीही सरकारने निष्पक्ष चौकशी करून धाडसी पाऊल उचलल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आभार मानले.
सीबीआय चौकशीवर विद्यार्थी गट ठाम
सरकारने सीआयडी चौकशी जाहीर केली असली तरी विद्यार्थी नेत्यांमध्ये अजूनही असंतोष आहे. परीक्षा रद्द करणे हे केवळ पहिले पाऊल आहे. आमच्या सर्व मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी लावली जात नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. अधिकृत जीआर आल्यावर आम्ही पुढील रणनीती ठरवू, असे विद्यार्थी नेते पियुष कुमार आणि रवींद्र पासरवान यांनी स्पष्ट केले.
News Alert! Devendra Mahto, on hunger strike for 16 days over job exam irregularities, says will soon reach protest site in Ranchi to break fast pic.twitter.com/qGhW2T9r5D
— Press Trust of India (@PTI_News) August 17, 2026
सरकारने परीक्षा केली रद्द
सोरेन यांनी प्रमुख मंत्र्यांसोबत सोमवारी घेतलेल्या बैठकीनंतर लोक सेवा आयोग-सीजीएल परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. या घोटाळ्यात अनेक कंपन्यांचे जाळे असून या कंपन्यांनी वेगवेगळ्या वेळी या ठिकाणी काम केले आहे. त्यामुळे 2014 पासून सर्व परीक्षांबाबत सीआयडीमार्फत तपास करण्यात येईल, असे सोरेन म्हणाले.






























































