
पेण नगर परिषदेने चिंचपाडा चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करून त्याठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे मॉडर्न आर्ट शिल्प साकारले होते. मात्र शिल्प पाहून शहरवासीय आणि शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. ‘माणूस आणि सिंहाची झुंज’ दर्शवणाऱ्या प्रतिकृतीला प्रखर विरोध करत हे शिल्प तातडीने हटवण्याची मागणी केली. अखेर नगर परिषदेने माघार घेत विवादास्पद शिल्प हटवले.
चिंचपाडा परिसरातील चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्याची मागणी छावा संघटना, सह्याद्री प्रतिष्ठान, माझं पेण, खारेपाट संकल्प संघटनेसह नागरिकांनी केली होती. त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी या चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले तसेच यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचे मॉडर्न आर्ट प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. या प्रतिकृतीचे अनावरण होताच शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली. या प्रतीकात्मक पुतळ्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विद्रुपीकरण झाल्याची भावना निर्माण झाली. समाज माध्यमांमध्ये प्रतिकृतीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी नगर परिषदेच्या या कृतीचा कडाडून विरोध केला. अखेर जनतेच्या आक्रोशापुढे प्रशासनाला झुकावे लागले. १५ तारखेला अनावरण केलेले शिल्प १७ तारखेला हटवण्यात आले. यासंदर्भात नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करून सर्वांना विश्वासात घेऊन लवकरच छत्रपती संभाजी महाराजांचा नवीन पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले.
शिल्प नेमके काय होते?
‘माणूस आणि सिंहाची झुंज’ दर्शवणारे मॉडर्न आर्ट / लो-पॉली प्रकारचे हे शिल्प आहे. हे शिल्प दुबईतील कॉंड्रा लेक येथील प्रसिद्ध ‘Man and Lion Geometric Sculpture’ ची हुबेहूब प्रतिकृती आहे. हे शिल्प कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीशी संबंधित नाही. जगभरात हे ‘धैर्य आणि संघर्ष’ या संदेशासाठी वापरले जाते.
निष्पक्ष चौकशी करा!
शिवप्रेमींनी तीव्र विरोधाची आणि आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाला हे शिल्प हटवावे लागले. मात्र या शिल्पासाठी २५ लाखांची वर्क ऑर्डर होती. त्यातील १८ लाख प्रतिकृतीसाठी आणि २ लाख चबुतऱ्यासाठी खर्च झाल्याचे सांगितले जाते. मग या पैशांचा हिशेब कोण देणार? कामाची गुणवत्ता आणि पैशांचा विनियोग याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी केली आहे.





























































