
महाकाय क्रेनचा धक्का लागल्याने मेट्रोच्या पुलाचे ग्रॅनाईट कोसळल्याचा धक्कादायक प्रकार आज भाईंदरमधील मेट्रो मार्गिका क्रमांक ९ च्या साईटवर घडला. त्याच वेळी मेट्रोच्या पुलाखालून स्कूल व्हॅन चालली होती. मात्र ती काही अंतर मागे असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र रस्त्यावर पडलेल्या ग्रॅनाईटमुळे ही स्कूल व्हॅन पंक्चर झाली आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर एमएमआरडीएने मेट्रोच्या बेफिकिर कंत्राटदाराला सुमारे दहा कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दहीसर ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गिका क्रमांक ९वरील मेडतिया नगर स्थानक परिसरात आज सकाळी सुमारे ११.४५ वाजता मेट्रो कंत्राटदारामार्फत बांधकाम साहित्य क्रेनच्या सहाय्याने उचलण्याचे काम सुरू होते. या क्रेनच्या बास्केटचा पादचारी पूल परिसरात ठेवलेल्या ग्रॅनाईटच्या दगडांना धक्का लागला. त्यामुळे हे ग्रॅनाईटचे दगड खाली रस्त्यावर पुलाखाली पडले. त्यातील काही दगड बॅरिकेडिंग केलेल्या क्षेत्राबाहेरसुद्धा आले. त्याच वेळी त्या ठिकाणाहून एक स्कूल व्हॅन जात होती. मात्र ती काही अंतर मागे असल्याने ग्रॅनाईटचे दगड या व्हॅनवर पडले नाहीत. ही स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांनी भरलेली होती. रस्त्यावर पडलेल्या ग्रॅनाईटवरून ही स्कूल व्हॅन गेल्यामुळे ती पंक्चर झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
- ही दुर्घटना घडल्यानंतर एमएमआरडीएने मेट्रोचे काम करणाऱ्या जे. कुमार या ठेकेदार कंपनीला १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मेट्रो सल्लागार मे. मेसर्स सिस्ट्रा-सीजीईआय-सिस्ट्रा (आय) या कंपनीला एक कोटीचा आणि स्थानकाचे काम करणारा ठेकेदार एन.ए. गजानन यांच्याकडून दीड कोटीचा दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
- या घटनेत कोणताही ग्रॅनाईटचा दगड स्कूल व्हॅनवर पडलेला नाही. त्यामुळे या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएच्या वतीने देण्यात आली आहे.






























































