
गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून जाहीर केल्यानंतर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी परदेशात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिल्या तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकूण १५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत मंडळांना एकूण २ कोटी २७ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
सव्वाशे वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून गेल्या वर्षी घोषित करण्यात आला होता. त्यानुसार यंदा गणेशोत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालये, आस्थापना आणि महामंडळांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी दिले.
यंदाच्या वर्षी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेची व्याप्ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील ४८० उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय स्तरावरील विजेत्या गणेशोत्सव मंडळांना एकूण २ कोटी २७ लाख ६० हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर विशेष भर
शाडूच्या मातीच्या मूर्ती, बीज गणपती, निर्माल्य संकलन आणि पुनर्वापर, प्लास्टिकमुक्त उत्सव, एलईडी सजावट आणि सौरऊर्जेवरील मंडप याबाबत राज्यभर जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामपंचायती, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येतील. जलस्रोतांची हानी टाळून जलसंवर्धनाबाबतही जनजागृती केली जाणार आहे.

























































