
महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत मतदार यादीतून 2 कोटी नावे वगळण्यात आल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस-आमदार रोहित पवार यांनी केला. एसआयआरनंतर 7 कोटी 69 लाख मतदारांची माहिती जमा केली गेली आहे. त्यात अपूर्ण माहिती आणि नावात बदल असलेल्या मतदारांचाही समावेश असल्याने ती वेगळी केली गेल्यानंतर हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचा बिहार आणि पश्चिम बंगाल करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यात एसआयआर मोहिमेचा आजचा शेवटचा दिवस होता. रोहित पवार यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन त्यांना या मोहिमेबाबत शंका उपस्थित करणाऱया अनेक मुद्दय़ांचा समावेश असलेले निवेदन दिले. या भेटीनंतर रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
भाजप कार्यकर्त्यांकडून बीएलओंवर दबाव
भाजपने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यात आपल्या विचारधारेचे मतदार, संदिग्ध मतदार आणि विरोधी मतदार अशा तीन पॅटेगरी केल्या आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेत बीएलओंनी घरोघरी न जाता बहुतांश ठिकाणी पक्षाच्या कार्यालयात बसून टेबल सर्व्हे केला. भाजपचे कार्यकर्तेच त्यांना माहिती पुरवत असल्याचे समोर आले आहे. त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन चोक्कलिंगम यांनी दिल्याचे रोहित पवार म्हणाले. इतर पक्षांचे आमदार ज्या मतदारसंघांत आहेत तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या सॉफ्टवेअरच्या मदतीने बीएलओंवर मतदार नोंदणीसाठी दबाव आणल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.
34 लाख मृत, 76 लाख गायब, 77 लाख स्थलांतरित
2 कोटी मतदारांची नावे कोणत्या आधारे यादीतून वगळण्यात आली यासंदर्भात चोक्कलिंगम यांना आम्ही माहिती विचारली. त्यात 34 लाख मतदार हे मृत झालेले आहेत. ज्यांच्या घरी कुणी सापडले नाही अशी 76 लाख नावे आहेत आणि जे कायमचे पत्ता बदलून गेलेत असे 77 लाख मतदार आहेत. इतर 2 लाख 30 जणांनी माहिती देण्यास, स्वाक्षरी देण्यास नकार दिल्याने त्यांनाही वगळण्यात आल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.



























































