मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी टाकले डिटर्जंट; बिहारमध्ये 36 विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळेतील माध्यान्ह भोजनात (मिड-डे मील) मिठाऐवजी चुकून डिटर्जंट पावडर टाकल्याने ३६ हून अधिक विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्याची धक्कादायक घटना बिहारमधील नालंदा जिल्ह्यात घडली आहे. जेवल्यानंतर विद्यार्थिनींना चक्कर येणे व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ही घटना नालंदा जिल्ह्यातील पारसी येथील माध्यमिक विद्यालयात घडली. बाधित विद्यार्थिनींना तातडीने बिहार शरीफ येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्वयंसेवी संस्थेकडून ठरवून दिलेल्या मेन्यूनुसार सोयाबीन भाजी आणि भाताचा पुरवठा करण्यात आला होता. काही विद्यार्थिनींनी जेवण सुरू केल्यानंतर अन्नात मीठ कमी असल्याची तक्रार केली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपाकघरात एकाच ठिकाणी मीठ आणि डिटर्जंट पावडरचे डबे शेजारी ठेवले होते. स्वयंपाक्याने चुकून मिठाऐवजी डिटर्जंट पावडर अन्नात टाकली. हे अन्न खाल्ल्यानंतर काही वेळातच मुलींना चक्कर येऊ लागली आणि उलट्या सुरू झाल्या. शाळेत प्रथमोपचार दिल्यानंतरही त्रास कमी न झाल्याने त्यांना तातडीने सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, बिहारचे ग्रामविकास मंत्री श्रवण कुमार यांनी रुग्णालयात जाऊन बाधित विद्यार्थिनींची भेट घेतली आणि डॉक्टरांशी चर्चा केली. माध्यान्ह भोजन तयार करताना आणि वाढताना ही मोठी चूक नेमकी कशी झाली, याची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले.