
भोपाळमध्ये मंगळवारी 18 ऑगस्ट ‘जेन अल्फा’ पिढीतील शेकडो विद्यार्थ्यांनी, आपल्या शाळेच्या भवितव्याच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. प्रादेशिक शाळेचे सुमारे 300 ते 400 विद्यार्थी केंद्रीय विद्यालय संघटनेत (KVS) शाळेचे विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात एकवटले. शैक्षणिक संस्थेच्या मुद्द्यावर ‘जेन अल्फा’विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.
विद्यार्थ्यांनी हातात ‘सेव्ह डीएमएस’सह विविध पोस्टर्स घेत शाळेबाहेर जोरदार निदर्शने केली. प्रादेशिक शाळेची स्वतंत्र ओळख कायम ठेवावी आणि तिचे KVSमध्ये विलीनीकरण करू नये, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विभागीय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. के. गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले. मागण्या मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार विद्यार्थी आणि पालकांच्या मते, प्रादेशिक शाळा ही केवळ एक सामान्य शाळा नसून शिक्षणातील प्रयोगशीलता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी तिची वेगळी ओळख आहे. या शाळेत अनेक शैक्षणिक प्रयोग करण्यात आले असून, त्याचा प्रभाव देशातील शालेय शिक्षण व्यवस्थेवरही पडला आहे. त्यामुळे शाळेचे KVS मध्ये विलीनीकरण झाल्यास तिच्या मूळ संकल्पनेवर आणि स्वतंत्र शैक्षणिक स्वरूपावर परिणाम होण्याची भीती विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली आहे.
विलीनीकरणाच्या प्रस्तावामुळे पालकांमध्ये सर्वाधिक चिंता KVSच्या प्रवेश प्रक्रियेबाबत आहे. केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी वेगवेगळे प्राधान्यक्रम असतात. त्यामुळे सध्या प्रादेशिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असेल आणि भविष्यात सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना प्रवेश मिळेल का, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
पालकांच्या माहितीनुसार, प्रादेशिक शाळेत नर्सरीपासून बारावीपर्यंत सुमारे 1 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध वर्गांमध्ये दोन विभाग असून, अकरावी आणि बारावीमध्ये कला व वाणिज्यसह विविध विषय शिकवले जातात. याशिवाय शाळेत व्यावसायिक अभ्यासक्रमही चालवले जातात. त्यामुळे KVSमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर या अभ्यासक्रमांचे काय होणार, सध्याच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे सुरू राहणार, शिक्षकांची व्यवस्था कशी केली जाणार आणि प्रवेशाचे नियम कोणते असतील, याबाबत पालकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.




























































