
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि त्याची पत्नी विनी रामन यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. मॅक्सवेल आणि विनी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असून विनीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या जोडप्याने मंगळवारी, १८ ऑगस्ट रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली.
ग्लेन आणि विनी एक मुलगा असून त्याचा जन्म ११ सप्टेंबर २०२३ रोजी झाला होता. लोगान मॅव्हरिक मॅक्सवेल असे त्याचे नाव आहे. तीन वर्षांनी मॅक्सवेलच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ग्लेन मॅक्सवेल आणि हिंदुस्थानी वंशाची विनी रमन यांची पहिली भेट डिसेंबर २०१३ मध्ये झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्रीचे नाते होते. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. २०१७ मध्ये दोघांनी आपले नाते अधिकृतरित्या जाहीर केले. फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. यानंतर २७ मार्च २०२२ रोजी मेलबर्न येथे ग्लेन आणि विनी विवाहबद्ध झाले. त्यांनी ख्रिश्चन पद्धतीसोबतच पारंपरिक तमिळ ब्राह्मण पद्धतीनेही विवाह केला. विनी रमन ही मेलबर्नमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करत होती.




























































