पर्यावरणाचे संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन होणार, पालघरमधील १२६ गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये; मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी, पालघर, वसईतील गावांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने पालघर जिल्ह्यातील १२६ गावांचा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात (इको सेन्सिटिव्ह झोन) समावेश करण्यात आला आहे. मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी, पालघर आणि वसई या तालुक्यांतील गावांचा त्यात समावेश आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमुळे संबंधित गावांच्या परिघापासून एक किलोमीटर परिसरात खनिज उत्खनन, दगडखाणी तसेच पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पांवर निर्बंध येणार आहेत. त्यामुळे अनियंत्रित विकासाला आळा बसण्यास मदत होणार आहे.

केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्यातील ५६ हजार ८२५ चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी इको सेन्सिटिव्ह झोनची अधिसूचना जाहीर केली आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमधील २५१५ गावांतील १७३४० चौरस किलोमीटर क्षेत्र या अधिसूचनेच्या कक्षेत आले आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात जंगल, डोंगर, नद्या आणि नैसर्गिक साधनसंपत्तीशी जोडलेला आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकास यांच्यात संतुलन साधणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करताना ग्रामस्थांना विश्वासात घेऊन नियमांची स्पष्ट माहिती देणे, स्थानिकांच्या पारंपरिक उपजीविकेचे संरक्षण करणे आणि पर्यावरणपूरक विकासाला प्रोत्साहन देणे हे प्रशासनापुढील प्रमुख आव्हान राहणार आहे. पालघर जिल्ह्यातील १२६ गावांचे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश हा परिसराच्या | नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे.

काय आहे इको सेन्सिटिव्ह झोन ?
इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि पर्यावरणीयदृष्ट्या नाजूक क्षेत्र. दुर्मिळ प्राणी-पक्षी, विविध प्रजातींची झाडे, वनौषधी, घनदाट जंगल तसेच वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता असलेल्या परिसरांचे संरक्षण करण्यासाठी अशा क्षेत्रांना विशेष दर्जा दिला जातो. नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण, दुर्लभ प्राणी-पक्ष्यांचे आश्रयस्थान टिकवणे, जल स्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण अबाधित राखणे हा इको सेन्सिटिव्हचा हेतू आहे.