
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आझम खान यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी पहाटे आझम खान आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित 10 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. रामपूर, सहारनपूर आणि देशाची राजधानी नवी दिल्ली येथे ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) ईडीकडून ही छापेमारी करण्यात येत आहे. तपास यंत्रणेकडून आझम खान यांचे आर्थिक व्यवहार, कथित आर्थिक अनियमितता आणि संशयास्पद निधीपुरवठ्याशी संबंधित बाबींची चौकशी केली जात आहे.
आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीच्या पथकांनी आझम खान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मौलाना मोहम्मद अली जौहर विद्यापीठ आणि त्याच्याशी संबंधित मौलाना मोहम्मद अली जौहर ट्रस्टशी संबंधित ठिकाणांवरही छापे टाकले आहेत. याशिवाय रामपूर आणि जौहर विद्यापीठाच्या परिसरातील काही अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचीही तपासणी केली जात आहे.
केंद्रीय सुरक्षा दलांच्या उपस्थितीत ईडीची पथके विविध ठिकाणी कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे तपासत आहेत. आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे, नोंदी आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासण्यावर तपास यंत्रणेचा भर असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. आझम खान यांच्याविरोधातील विविध प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ईडीच्या या छापेमारीकडे महत्त्वपूर्ण कारवाई म्हणून पाहिले जात आहे. मात्र, या छाप्यांमध्ये नेमके कोणते पुरावे किंवा कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.




























































