
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीमधील ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणाचा अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेला तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुह्याचे आर्थिक गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिट पूर्ण केले असून, त्यामध्ये 47 कोटी 11 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींविरोधात लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये राज्यातील विविध जिह्यांतील ठेवीदारांच्या सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. संस्थेचे चेअरमन सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना आणि परभणी जिह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे एकूण 112 गुन्हे दाखल आहेत. श्रीरामपूर येथील ठेवीदारांचे पैसे ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये अडकल्याने त्यांनी 29 जुलै 2024 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा पुढील तपासासाठी अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
या तपासादरम्यान पोलिसांनी आतापर्यंत 18 संशयित आरोपी निष्पन्न केले असून, त्यापैकी 12 जणांना अटक केली आहे. तसेच 300पेक्षा अधिक ठेवीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने गुह्याच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास करत फॉरेन्सिक ऑडिट केले. या ऑडिटमधून श्रीरामपूर प्रकरणात 47 कोटी 11 लाख 37 हजार 146 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तपास यंत्रणेकडून आता कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि साक्षीदारांचे जबाब यांची सांगड घालत दोषारोपपत्र अंतिम करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, जामखेड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात 7 ऑगस्ट 2024 रोजी 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हाही आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला होता. जामखेड प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, श्रीरामपूर प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, अटक केलेल्या 12 आरोपींविरुद्ध लवकरच दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
सहा आरोपी पसार
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुह्यात चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे (वय 48, रा. बीड), व्हाईस चेअरमन यशवंत वसंतराव कुलकर्णी (वय 55, रा. बीड), वसंत शंकरराव सटाले (वय 53, रा. पिंपळगाव, ता. माजलगाव, जि. बीड), संचालक वैभव यशवंत कुलकर्णी ( वय 26, रा. बीड), कैलास काशिनाथ मोहिते (वय 36, रा. बीड), रवींद्र मधुकर तलबे (वय 40, रा. निर्मलनगर, सावेडी, अहिल्यानगर), आशीष पद्माकर पाटोदेकर-पाटील (वय 33, रा. सोलापूर), आशा पद्माकर पाटोदेकर-पाटील (वय 50, रा. सोलापूर), रघुनाथ सखाराम खरसाडे (वय 40, रा. बीड), रवींद्र श्रीरंग यादव (वय 52, रा. बीड), दादाराव हरीदास उंदरे (वय 55, रा. छत्रपती संभाजीनगर) आणि अर्चना सुरेश कुटे (वय 45, रा. बीड) यांना अटक करण्यात आली आहे. तर, शिवाजी पारसकर, रेखा सटले, निर्मलसिंग चव्हाण, विठ्ठल बनकर, संग्राम चाळक आणि अमोल खेत्रे हे अद्याप पसार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.



























































