
येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालय प्रकल्पातील वन्य प्राण्यांची देशातील विविध प्राणिसंग्रहालयांमध्ये देवाणघेवाण करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (सीझेडए), नवी दिल्लीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार गोरेवाडय़ातील वाघ आणि बिबट्यांची हरयाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड आणि पुणे येथील प्राणिसंग्रहालयांमध्ये पाठवणी केली जाणार आहे. त्या बदल्यात नागालँड आणि हिमाचल प्रदेशातील काही वन्य प्राणी व पक्षी गोरेवाडा प्रकल्पात आणले जाणार आहेत.
गोरेवाडा वन्य जीव बचाव केंद्राकडून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे प्राण्यांच्या देवाणघेवाणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार, हरयाणातील रोहतक प्राणिसंग्रहालयाला एक नर आणि दोन मादी वाघ तसेच एक नर व एक मादी बिबटय़ा देण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशातील रेणुकाजी मिनी झू, सिरमौर येथे एक नर व एक मादी वाघ पाठविण्यात येतील. नागालँडमधील नागालँड प्राणी उद्यान, दिमापूर आणि पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व वन्य जीव संशोधन केंद्राला प्रत्येकी एक नर व एक मादी वाघ देण्यास मंजुरी आहे.
गोरेवाडाला काय मिळणार?
या देवाणघेवाणीच्या बदल्यात गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला नागालँड प्राणी उद्यान, दिमापूर येथून एक नर व एक मादी हिमालयीन काळे अस्वल मिळणार आहे. तसेच रेणुकाजी मिनी झू, सिरमौर येथून दोन नर व दोन मादी रेड जंगल फाऊल आणण्यात येणार आहेत.
- ऑक्टोबर 2021 मध्ये गोरेवाडय़ातील दोन वाघिणी आणि दोन अस्वल दिल्लीत पाठवण्यात आले होते.
- त्या बदल्यात गोरेवाडय़ाला काळवीट, सांबर आणि भेकर मिळाले होते.



























































