
कोथरूडचे आमदार व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील विकासकामांचे ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांना भोवल्याचे चित्र पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले. बालवडकर यांच्या प्रभागासाठी वर्गीकरणातून उपलब्ध करून दिलेला सुमारे १२ कोटी रुपयांचा विकास निधी पुन्हा वर्गीकरण करून काढून घेण्याचा प्रस्ताव भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. या निर्णयावरून सभागृहात जोरदार गोंधळ झाला.
मार्चमध्ये झालेल्या महापालिका अर्थसंकल्पात बालवडकर यांच्या प्रभागाला सुरुवातीला शून्य विकासनिधी देण्यात आला होता. त्यावर आक्षेप घेतल्यानंतर चूकभूल झाल्याचे सांगत प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ वर्गीकरणातून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर स्थायी समितीमार्फतही संबंधित विकासकामांसाठी तरतूद करण्यात आली. मात्र, मागील आठवड्यात बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कोथरूड मतदारसंघात झालेल्या कामांचे विशेष लेखापरीक्षण आणि आवश्यकतेनुसार थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट करण्याची मागणी करणारा प्रस्ताव स्थायी समितीत मांडला. त्यानंतर बालवडकर यांच्या निधीचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. नेमके याच बैठकीला बालवडकर उपस्थित नव्हते.




























































