
खालापूर तालुक्यातील चौक परिसरामधील अति दुर्गम उंबरणेवाडी येथील गर्भवती महिलेला झोळीचा वापर करून उपचारासाठी दवाखान्यात आणण्याचे भीषण वास्तव सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील भकास विकास चव्हाट्यावर आणल्यानंतर भाजप आमदार महेश बालदी यांचा तिळपापड झाला आहे. उंबरणेवाडीतील काही मुले आगाऊ आहेत. आमच्यावर रिल्स टाकतात पण आम्हाला काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांची जीभघसरली. त्यांच्या या बेजबाबदार वक्तव्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
खालापूर तालुक्यामधील लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील उंबरणेवाडी, आरकसवाडी, पिरकडवाडी अशा गावांना अद्याप रस्ता, लाईट नाही. रस्ता नसल्याने मैलोन्मैल आजही गर्भवती स्त्रियांना झोळीतून दवाखान्यात नेले जाते आणि उपचारानंतर झोळीतूनच घरी आणले जाते. त्यामुळे एकीकडे विकासाच्या गप्पा मारणारे उरणचे आमदार महेश बालदी यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. उरण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या या गावांना अद्याप रस्ता, लाईट नसल्याने महेश बालदी यांच्या कामगिरीची व्यथा सोशल मीडियामधील रिल्सच्या माध्यमातून उंबरणेवाडी येथील प्रदीप उघडा या तरुणाने जगासमोर आणली. रिल्स पाहून आमदार महेश बालदी यांचा पारा चढला. रिल्स पाहून गावागावात प्राथमिक सुविधा निर्माण करण्याऐवजी रिल्समुळे आम्हाला काही फरक पडत नाही, अशी मुजोरीची भाषा महेश बालदी यांनी केल्याने आदिवासी बांधवांनी संताप व्यक्त केला.
भयानक वास्तव
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर याठिकाणी रस्ता होईल, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी दिले होते. मात्र रस्ता झालाच नाही. रहिवाशांना दऱ्याखोऱ्यांतून पुढील वाट शोधावी लागते. खालापूर तालुक्यात इतके भयाण वास्तव असूनही महेश बालदी असंवेदनशील वागत असल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
दोन वर्षांपूर्वी आमदार महेश बालदी आमच्या वाडीत नवरात्रोत्सवात येऊन गेले. मी तुम्हाला लाईट, रस्ता देईन अशी त्यांनी देवी समोर शपथ घेतली. परंतु आजपर्यंत काहीच झालं नाही. त्यांनी देवीसमोर खोटी शपथ घेऊन ग्रामस्थांना फसवले. – प्रदीप उघडा, ग्रामस्थ





























































