‘माझे गाव, बालविवाहमुक्त गाव’ , करंदी गावाचा सामाजिक परिवर्तनाचा संकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री समृद्धी गाव योजनेत द्वितीय क्रमांक पटकावलेल्या करंदी गावाने सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. यावेळी ‘माझे गाव, बालविवाहमुक्त गाव’ हा संकल्प ग्रामस्थांनी एकमुखाने स्वीकारत गावातील मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचा निर्धार केला.

‘माझे गाव, बालविवाहमुक्त गाव’ या अभियानाची रूपरेषा उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी स्पष्ट केली. यामध्ये गावातील प्रत्येक विद्यार्थिनीने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याशिवाय तिचा विवाह केला जाणार नाही, अशी प्रतिज्ञा घेण्याचा संकल्प मांडला. बालविवाह रोखण्यासाठी केवळ कायद्याचा आधार न घेता गावपातळीवर सामाजिक सहभागातून प्रतिबंधात्मक उपाययोजना उभारण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. या उपक्रमातून गावातील जोखीमग्रस्त मुली, दहावीनंतर शिक्षण सोडलेल्या मुली तसेच प्रेमप्रकरणामुळे अडचणीत येऊ शकणाऱ्या मुलींची विशेष नोंद घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. मुलींचे शिक्षण मध्येच खंडित होऊ नये, यासाठी पालकांशी संवाद साधण्याबरोबरच त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

बालविवाहाच्या दुष्परिणामांविषयी गावात सातत्याने जनजागृती करण्यासाठी महिन्यातून दोन प्रबोधन कार्यक्रम घेण्याचा निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आला. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत बालविवाहाला सामाजिक विरोध उभा करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

उडान प्रकल्पाच्या पुढाकारातून ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या या विशेष ग्रामपंचायत बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अधिकारी ओल्विन शेक्सपिअर होते. सरपंच नंदाताई गव्हाणे, उपसरपंच अर्जुनराव ठाणगे, उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, सीआरपी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक चळवळ उभारण्याचा निर्धार

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर करंदी ग्रामस्थांनी घेतलेला हा संकल्प केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता गावाच्या सामाजिक चळवळीत रूपांतरित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.