
कोलकात्यात बुधवारी पहाटे एका हॉटेलला भीषण आग लागून 9 जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सर्वजण बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. हे नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी कोलकात्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकात्यातील मिर्झा गालिब स्ट्रीटवरील हॉटेलमध्ये पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यावेळी हॉटेलमधील बहुतांश रहिवासी झोपेत होते. अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पसरल्याने हॉटेलमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.
आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र, आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचताना जवानांना अडचणींचा सामना करावा लागला.
अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून आगीमागील कारणाचा तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये हॉटेलला आग लागण्याची ही काही दिवसांतील दुसरी मोठी घटना आहे. सोमवारी बीरभूम जिल्ह्यातील एका चार मजली हॉटेलला आग लागली होती. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले होते.





























































