
प्रभासच्या आगामी चित्रपटांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेता सध्या हनु राघवपुडी यांच्या ‘फौजी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर प्रभास संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ आणि ‘कल्की 2898 एडी’च्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. मात्र, प्रभासच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ‘स्पिरिट’च्या शूटिंगला विलंब होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे हा चित्रपट ठरलेल्या तारखेला प्रदर्शित होणार की पुढे ढकलला जाणार, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र आता ‘स्पिरिट’च्या निर्मात्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. टी-सीरीजच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे की, चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ‘स्पिरिट’ 5 मार्च 2027 रोजीच जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. टी-सीरीजच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, “‘स्पिरिट’च्या रिलीजसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. चित्रपट 5 मार्च 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या रिलीज डेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आम्ही नियोजित वेळापत्रकानुसार काम करत आहोत.
‘स्पिरिट’ 5 मार्च 2027 रोजी प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच काळात सलमान खान आणि वामसी यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही चर्चा आहे. त्यामुळे प्रभास आणि सलमान खान यांच्यात बॉक्स ऑफिसवर थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. सध्या तरी निर्मात्यांनी ‘स्पिरिट’ची रिलीज डेट कायम असल्याचे स्पष्ट केले असून, 5 मार्च 2027 रोजीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार काही दिवसांपासून ‘स्पिरिट’च्या शूटिंगला उशीर होत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. एका रिपोर्टनुसार, चित्रपटाचे अद्याप सुमारे 75 दिवसांचे शूटिंग बाकी असल्याचे सांगितले जात होते. दुसरीकडे प्रभासच्या आगामी चित्रपटांसाठीच्या तारखा आधीच व्यस्त आहेत. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत ‘स्पिरिट’चे शूटिंग आणि पोस्ट-प्रॉडक्शनचे काम पूर्ण करणे आव्हानात्मक ठरू शकते, अशी चर्चा होती.
याच पार्श्वभूमीवर चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याबाबत टी-सीरीजमध्ये अंतर्गत चर्चा सुरू असल्याचेही वृत्त आले होते. जून 2027 मध्ये आयपीएलनंतर चित्रपट प्रदर्शित करण्याच्या पर्यायाचाही विचार केला जात असल्याची चर्चा होती. मात्र, निर्मात्यांच्या ताज्या स्पष्टीकरणानंतर या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला आहे.




























































